एक्स या सोशल मीडियावरुन विराली मोदी नावाच्या तरुणीने आपली व्यथा मांडली आहे. दिव्यांग हक्क कार्यकर्ता असलेल्या विरालीचे १६ ऑक्टोबर रोजी लग्न झाले. यावेळी आपला अनुभव सांगताना ती म्हणाली की खार भागातील रजिस्ट्रार कार्यालयात ती विवाह नोंदणीसाठी गेली, मात्र तिला मदत करण्यासाठी कोणीही पुढे आले नाही.
काय आहे विरालीची पोस्ट?
“मी दिव्यांग आहे. माझे लग्न १६ ऑक्टोबर रोजी मुंबईतील खार येथील रजिस्ट्रार ऑफिसमध्ये झाले. ऑफिस दुसऱ्या मजल्यावर असून तिथे लिफ्ट नव्हती. संबंधित अधिकारी माझी स्वाक्षरी घेण्यासाठी खाली यायला तयार नव्हते. त्यामुळे मला लग्नासाठी पायऱ्यांवरुन उचलून न्यावे लागले” अशी पोस्ट विरालीने बुधवारी लिहिली होती.
विवाह नोंदणी कार्यालयातील पायऱ्या गंजलेल्या आहेत. संबंधित अधिकाऱ्यांना माझ्या दिव्यंगत्वाची पूर्वसूचना देऊनही कोणीही कुठल्याही प्रकारची मदत करण्यासाठी आलं नाही. लग्नासाठी ऑफिसमध्ये जात असताना पायऱ्यांवरून पडून मला काही झालं असतं तर? असा सवालही तिने केला.
“पायऱ्या अतिशय उंच होत्या आणि रेलिंग सैल आणि गंजलेले होते. पूर्वीच मी माझ्या एजंटला माझ्या दिव्यंगत्वाची माहिती दिली होती, तरीही कोणीही मला मदत करण्यासाठी आले नाही किंवा त्यांनी माझ्यासाठी कोणत्याही प्रकारची सोय केली नाही” असेही तिने लिहिले.
“माझ्या देशाचे सरकार आणि नागरिक माझ्या दिव्यंगत्वाला सामावून घेऊ शकत नाहीत याबद्दल मला दु:ख झाले. या अग्निपरीक्षेने माझा माणुसकीवरील विश्वास नष्ट झाला आहे. दोन मजले उचलून न्यायला मी काही सामान नाही. मी एक माणूस आहे आणि माझे हक्क महत्त्वाचे आहे” असेही विरालीने लिहिले आहे.
तिचा उदासीन अनुभव वाचून अनेकांनी आपली मतं मांडली आहेत. काही जणांनी लग्नाबद्दल तिचं अभिनंदन केलं आहे, तर अनेकांनी आयुष्यातील एका महत्त्वाच्या दिवशी तिला ज्या त्रासाला सामोरे जावे लागले त्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली.
देवेंद्र फडणवीसांकडून दिलगिरी
सर्वात महत्त्वाची प्रतिक्रिया आहे ती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची. फडणवीसांनी विरालीचे अभिनंदन केले आणि अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करणार असल्याचेही सांगितले.
“सर्वप्रथम नवीन शुभारंभाबद्दल खूप खूप अभिनंदन आणि तुम्हा दोघांना खूप आनंदी आणि सुंदर वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा! तसेच तुम्हाला झालेल्या गैरसोयीबद्दल मी खरोखर दिलगीर आहे. मी वैयक्तिकरित्या दखल घेतली असून याबाबत मी सुधारणा करुन योग्य कारवाई करीन.” असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News