• Sat. Sep 21st, 2024

यूपीचा कुख्यात दरोडेखोर पनवेलमध्ये कॅबचालक, २३ व्या वर्षी आरोपीवर ३३ जबर गुन्हे

यूपीचा कुख्यात दरोडेखोर पनवेलमध्ये कॅबचालक, २३ व्या वर्षी आरोपीवर ३३ जबर गुन्हे

म. टा. वृत्तसेवा, पनवेल : ३३ वेगवेगळे गुन्हे दाखल असलेला, उत्तर प्रदेश पोलिस शोध घेत असलेला कुख्यात दरोडेखोर पनवेलमध्ये विनापरवाना ओलाउबरचा व्यवसाय करीत असल्याचे समोर आले आहे. पनवेल शहर पोलिस ठाणे आणि वाराणसीच्या स्पेशल टास्क फोर्सने ही संयुक्त कारवाई करून चोराला ताब्यात घेतले. अवघ्या २३ वर्षांच्या या तरुणावर ३३ गुन्हे दाखल असल्यामुळे पोलिसांना धक्का बसला आहे.

काय आहे प्रकरण?

दुहेरी हत्यांसह तीन दरोडे, हत्येच्या प्रयत्नांचे सात गुन्हे, जबरी चोरी, यांसह वेगवेगळ्या प्रकारचे तब्बल ३३ गुन्हे दाखल असलेला हारिस उर्फ छोटू अब्दुल अजीज, वय २३ (रा. मुडीयार, आजमगड) या आरोपीचा शोध उत्तर प्रदेश पोलिस घेत होते. यूपी पोलिसांच्या वाराणसी स्पेशल टास्क फोर्सला मिळालेल्या माहितीनुसार, फरार आरोपी पनवेलमध्ये ओला-उबर चालवित असल्याचे समजले. त्यानुसार दोन दिवसांपूर्वी यूपी पोलिस आरोपीचा शोध घेण्यासाठी पनवेलमध्ये आले होते. आकुर्ली येथे वास्तव्यास असलेला छोटू अब्दुल अजीज पनवेल, नवी मुंबईसह इतर भागांत ओलाउबरवर चालक म्हणून काम करीत होता. पनवेल शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत आलेल्या छोटूला सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. पनवेल शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली बेड्या ठोकण्यात यश आले. यूपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन महाराष्ट्रात टॅक्सीचालकाचा व्यवसाय करणाऱ्या छोटूला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी पनवेल शहर पोलिसांचे आभार मानले आहेत. उत्तर प्रदेशातील आजमगढ, आंबेडकरनगर, जौनपूर जिल्ह्यांतील वेगवेगळ्या १३ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत चोरी, दरोडा, हत्या आदी गुन्हे दाखल असलेल्या आरोपीला पकडण्यास मदत करणाऱ्याला ५० हजारांचे बक्षीसही मागील महिन्यात जाहीर करण्यात आले होते. या चोराने गुन्हे करून भावाच्या नावावर असलेल्या टॅक्सीचा चालक म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती.

कुऱ्हाडीच्या धाकाने विद्यार्थिनीवर अत्याचार, नागपूरच्या ‘जंगल बॉय’ची होणार ओळख परेड
पनवेल पोलिसांना बक्षीस मिळणार का?

उत्तर प्रदेशमधील आजमगढ परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक अखिलेश कुमार यांनी सप्टेंबर महिन्यात छोटू अब्दुल अजीज या चोरावर ५० हजारांचे बक्षीस जाहीर केले होते. आरोपीला पकडून अटक करणाऱ्यांना किंवा अटक करण्यास मदत करणाऱ्याला ५० हजारांचे बक्षीस जाहीर केले होते. पनवेल शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या टीमने चोराला पकडण्यास यूपी पोलिसांना मदत केल्यामुळे हे बक्षीस त्यांना मिळेल की नाही, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed