आरटीओ विभागाने रस्ता सुरक्षेअंतर्गत गेल्या काही महिन्यांपासून नागरिकांमध्ये वाहतूक नियमांची अंमलबजावणी करावी. यासाठी विशेष मोहीम सुरू केली. या अंतर्गत आरटीओ निरीक्षकांच्या पथकाने जिल्ह्यातील विविध शासकीय, निमशासकीय, कंपनी, औद्योगिक वसाहतींमधील छोटे उद्योजक याशिवाय शैक्षणिक संस्था आणि इतर व्यावसायिक संस्था ज्यामध्ये कर्मचारी संख्या अधिक आहे, अशा कार्यालयांच्या प्रमुखांसोबत बैठक घेतली. या बैठकीत या संस्थेमध्ये दुचाकीवरून येत असलेल्या कर्मचाऱ्यांना किंवा अधिकाऱ्यांना हेल्मेट घालून कार्यालयात येण्याबाबत सूचना देण्याबाबत विनंती केली. या अंतर्गत एकूण ७०० च्या वर कंपनी; तसेच छोटे-मोठे उद्योजक आणि व्यावसायिकांच्या प्रतिष्ठानात ही जनजागृती केली होती. या विनंतीनंतर अनेक कंपन्यांनी त्यांच्या कार्यालयाच्या परिसरात हेल्मेटच्या शिवाय दुचाकी वाहनांना प्रवेश बंद करण्याची नोटीस लावली.
या जनजागृती अभियानानंतरही विनाहेल्मेट कार्यालयात येणाऱ्या किंवा कंपनीत येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. आरटीओ विभागाच्या विविध पथकाने १५ जून ते १० ऑक्टोबर या काळात कंपनी किंवा व्यावसायिक संस्थेमध्ये लागलेल्या सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे तीन हजार १९९ जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे. या कारवाईमुळे दुचाकीस्वार हेल्मेटचा वापर करतील. यामुळे अपघातात मृत्युमुखीचे प्रमाण कमी होईल, अशीही माहिती आरटीओ विभागाकडून देण्यात आली आहे.
अशी घातली समजूत
आरटीओ विभागाच्या विविध पथकांकडून संस्थेच्या सीसीटीव्ही फूटेजवरून कारवाई करण्यात येत आहे. याबाबत काही संस्थेच्या प्रतिनिधींनी शंका उपस्थितीत केली होती. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी वाहन अपघाताची आकडेवारी त्यांच्यासमोर मांडली. दंड ठोठविणे आपला हेतू नसून, नागरिकांनी हेल्मेटचा वापर करावा असे आहे. आपला एखादा कर्मचारी विनाहेल्मेट आपल्या कार्यालयाकडे येत असताना किंवा जात असताना त्याचा अपघात झाला. त्यात त्याचा मृत्यू झाला, तर त्याचा परिवार उघड्यावर पडले. यामुळे तुमच्या कर्मचाऱ्यांनी दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करावा. यासाठी ही कारवाई असल्याची माहिती दिल्यानंतर संबंधितांनी याबाबत कारवाईचे समर्थनही केले, अशी माहिती आरटीओकडून देण्यात आली आहे.