आरक्षणाच्या विषयावर मंथन करण्यासाठी आज, सोमवारी विदर्भातील ओबीसी संघटनांची रविभवन येथे सकाळी ११ वाजता बैठक होणार आहे. यात ४० संघटना सहभागी होतील, अशी माहितीही वडेट्टीवर यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. जरांगे-पाटील यांच्याकडून सरकारला आरक्षणासाठी देण्यात आलेल्या मुदतीबद्दल विचारले असता वडेट्टीवार म्हणाले, मागणी केली की असे आरक्षण जाहीर करता येत नाही. त्यांनी सरकारला दहा दिवसांची मुदत दिली आहे. पण, असे दहा दिवसांत आरक्षण देता येते का? पुन्हा एकदा मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसल्या जातील. त्यामुळे आता यावर ठोस भूमिका घेण्याची सरकारची जबाबदारी आहे, असे वडेट्टीवार म्हणाले. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये, असे सांगताना वडेट्टीवार यांनी, सरकारने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिल्यास ओबीस समाज रस्त्यावर उतरेल, असा इशारा दिला.
यावेळी जरांगे-पाटील ‘श्रद्धेय फडणवीस’ म्हणत असतील आणि इतरांना एकेरी भाषेत बोलत असतील, तर त्यांनी कुणाकुणाचा पान उतारा केला याची यादी आमच्याकडे आहे. त्यांनी आता नैतिकतेचे धडे शिकवू नये. वारंवार भूमिका बदलणारे अनेक नेते राज्यात तयार झाले आहेत. रंग बदलू मंडळींची महाराष्ट्रात भर पडत असल्याचा टोलाही वडेट्टीवार यांनी यावेळी लगावला.
‘समृद्धीवरील अपघात सरकारच्या घाईमुळे’
समृद्धी महामार्गाचे काम अर्धवट स्थितीत आहे. सर्व सुविधा सुरू झाल्यानंतर हा रस्ता सुरू करण्याची गरज होती. या मार्गावर ना आराम करण्याची व्यवस्था आहे; ना इतर कुठल्या सुविधा आहेत. समृद्धीच्या कामात भ्रष्टाचार झाला आहे कुणीही नाकारू शकत नाही. घाई गडबडीत काम करण्यात आले. त्यामुळे आज निष्पाप लोकांचा बळी जात आहे. हे अपघात सरकारच्या घाईमुळे होत आहे. महामार्गाचे काम सदोष नाही; तर यात तांत्रिक अडचणी आहेत. समृद्धी महामार्गावरील वाहतूक थांबवावी. समृद्धी सुरू ठेवायचा की नाही यावर विचार झाला पाहिजे, असेही विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले.