यंदा डेंगीचे प्रमाण नेहमीपेक्षा जास्त आहे आणि काही महिन्यांपासून शहर परिसरात डेंगी व डेंगीसदृश रुग्ण लक्षणीय प्रमाणात दिसून येत आहेत. पुन्हा बाहेरगावांतील डेंगीचे रुग्णही शहरात उपचारासाठी येण्याचे प्रमाण जास्त आहे. आजघडीला बहुतेक रुग्णालयांच्या बाह्य रुग्ण विभागात (ओपीडी); तसेच आंतररुग्ण विभागात (आयपीडी) डेंगी व डेंगीसदृश रुग्ण उपचार घेत असल्याचे सहजच दिसून येत आहे. हे कमी म्हणून की काय आता व्हायरल न्यूमोनियाचे रुग्णही मागील एक ते दोन आठवड्यांपासून वाढत आहेत. त्यामुळे आता डेंगीबरोबरच न्यूमोनियाचे रुग्णदेखील ‘ओपीडी’ व ‘आयपीडी’त आढळून येत आहेत. या संदर्भात शहरातील फिजिशियन डॉ. अनंत कुलकर्णी म्हणाले, ‘सर्दी-खोकला हा फुप्फुसांपर्यंत पोहोचतो, तेव्हा त्या स्थितीला सर्वसाधारणपणे न्यूमोनिया म्हटले जाते. अशा स्थितीत खोकला बरेच दिवस राहण्याची शक्यता असते. अर्थातच, ज्येष्ठांमध्ये न्यूमोनियाचे प्रमाण जास्त दिसून येत आहे. त्यामुळे ज्येष्ठ व्यक्तींना सर्दी-खोकला झाला, तर पुढील गुंतागुंत टाळण्यासाठी वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.’
तर, ‘यंदा व्हायरल न्युमोनियाचे प्रमाण जवळजवळ दीडपट जास्त आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. अशा केसेसमध्ये दोन-दोन आठवडे खोकला कमी होत नसल्याचे आढळून येत आहे. पुन्हा एकूण दाखल रुग्णांमध्येही न्यूमोनियाचे रुग्ण अधिक असल्याचे जाणवत आहे. सर्वसाधारणमध्ये ‘आयपीडी’तील ३० ते ५० टक्के रुग्ण हे व्हायरल न्यूमोनियाचे, तर २० ते ३० टक्के रुग्ण हे डेंगीचे आहेत,’ असे निरीक्षण डॉ. आनंद देशमुख यांनी नोंदवले.
लहान बालकांना त्रास
‘व्हायरल न्यूमोनियाचे प्रमाण वाढलेले आहेच. त्यातही दोन वर्षांच्या आतील बालकांना याचा अधिक त्रास होत आहे. त्यामुळे लहान बालकांच्या सर्दी-खोकल्यावर वेळीच उपचार होणे गरजेचे आहे,’ असे निरीक्षण बालरोगतज्ज्ञ डॉ. सुहास रोटे यांनी नोंदवले.
डेंगी, व्हायरल न्यूमोनियाचे प्रमाण नक्कीच वाढले आहे आणि स्वाइन फ्लू सदृश रुग्णही काहीअंशी पाहायला मिळत आहेत. यापैकी काही रुग्णांना नक्कीच दाखल करावे लागत आहे. अर्थातच, न्यूमोनियाचे दाखल करावे लागणारे बहुतांश रुग्ण हे ५५पेक्षा जास्त वयाचे आहेत.- डॉ. आनंद देशमुख, फिजिशियन
ज्येष्ठ व्यक्तींनी; तसेच मधुमेहींनी, मूत्रपिंडविकार असलेल्या व एकूणच प्रतिकारशक्ती कमी झालेल्या व्यक्तींनी सर्दी-खोकल्याकडे दुर्लक्ष करू नये. सर्दी-खोकला वाढून फुप्फुसांपर्यंत पोहचण्याची व गुंतागूंत निर्माण होण्याची शक्यता असते.- डॉ. अनंत कुलकर्णी, फिजिशियन