या सभेसाठी राज्यभरातील मराठा बांधवांनी मोठी गर्दी केली होती. या विराट जनसमुदायासमोर मनोज जरांगे पाटील काय बोलणार, याची उत्सुकता सर्वांना लागली होती. आपल्या भाषणामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या पुन्हा एकदा तपशीलवारपणे मांडल्या. यानंतर जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्याविरोधात कोर्टात धाव घेणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांच्यावर जोरदार आगपाखड केली. त्यांनी म्हटले की, मध्यंतरी एकजण उठला आणि मला अटक करा, अशी मागणी केली. तो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कार्यकर्ता आहे, असं लोक म्हणतात. उपमुख्यमंत्र्यांनी ही येडपटं पाळलीच कशी? गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले की, मराठा समाज हिंसा करेल, त्यामुळे मनोज जरांगे पाटलांना अटक करा. ही मराठ्यांची औलाद हिंसा करणारी नाही. जेव्हा आझाद मैदानावर गुणरत्न सदावर्ते यांनी आंदोलन केलं तेव्हा यश मिळवण्यासाठी त्यांनी ‘एक मराठा लाख मराठा’ घोषणा दिली. आता एक लाख मराठे एकत्र आलेत, त्यांचे कल्याण होणार आहे तर सदावर्ते सांगतात मला अटक करा. मला अटक करणं आता सोपं आहे का? देवेंद्र फडणवीसांनी एकदा सदावर्तेंना समज द्यावी. त्यांनी मराठा समाजाला अंगावर घेऊ नये. याच मराठ्यांनी तुम्हाला १०६ आमदार निवडून दिले आहेत. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आणण्यात मराठ्यांचा वाटा आहे. पंतप्रधान मोदींनी देवेंद्र फडणवीस यांना समज द्यावी. खालचे कार्यकर्ते मराठा समाजाच्या अंगावर घातले जात आहेत, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.
केंद्र आणि राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावे, ते तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील. तुमच्या विजयानंतर ट्रक दिल्लीपर्यंत आणून तुमच्यावर गुलाल उधळतील, असेही जरांगे-पाटील यांनी सांगितले. राज्य सरकारने येत्या १० दिवसांमध्ये मराठा समाजाला आरक्षण द्यावे. अन्यथा २२ ऑक्टोबरला तुम्हाला काय करायचं हे सांगू. आपल्याला पुढील आंदोलन हे शांततेच्या मार्गानेच करायचे आहे. याच मार्गाने मराठा समाज आरक्षण मिळवेल, हा शब्द आहे, असेही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.