• Sat. Sep 21st, 2024

कॉर्पोरेट टीम लीडरने नोकरी सोडली, वडिलांची चेतक स्कूटर काढली, आईला घेऊन भारत भ्रमणाला

कॉर्पोरेट टीम लीडरने नोकरी सोडली, वडिलांची चेतक स्कूटर काढली, आईला घेऊन भारत भ्रमणाला

म. टा. प्रतिनिधी, पुणे: कावडीतून आई-वडिलांना यात्रा घडविणाऱ्या श्रावणाबाळाप्रमाणेच आजच्या आधुनिक युगात म्हैसूरमध्ये राहणारे डी. कृष्णकुमार हे ७३ वर्षीय आई चुडारत्नम्मा यांना भारताची सफर घडवीत आहेत. वडिलांनी दिलेल्या २२ वर्षे जुन्या स्कूटरवरून ही भ्रमंती सुरू आहे. गेल्या पाच वर्षांपासून त्यांची भ्रमंती सुरू असून, त्यांनी आतापर्यंत ७७ हजार ५४५ किलोमीटरचा टप्पा पार केला आहे. सध्या ते पुण्यात पोहोचले आहेत.

बेंगळुरूमधील विविध आयटी कंपन्यांमध्ये डी. कृष्णकुमार यांनी कॉर्पोरेट टीम लीडर म्हणून काम केले. वडिलांच्या निधनानंतर आईची सेवा करण्याच्या उद्देशाने नोकरी सोडली. गावी दहा जणांचे कुटुंब असल्याने जबाबदारीमुळे त्यांच्या आईला घराजवळील मंदिरेही पाहता आली नव्हती. त्यामुळे कृष्णकुमार यांनी मातृसेवा संकल्प यात्रेला सुरुवात केली. म्हैसूरपासून सुरू झालेल्या या यात्रेत त्यांनी भारतासह नेपाळ, म्यानमार आणि भूतानची सफरही आईला घडविली आहे. या यात्रेमध्ये त्यांनी अनेक धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. ‘वडिलांनी भेट दिलेल्या बजाज चेतक या स्कूटरवरून ‘मातृसेवा संकल्प यात्रा’ करण्यात येत आहे.

१६ जानेवारी २०१८ रोजी म्हैसूरहून याची सुरुवात झाली. सुमारे दोन वर्षे प्रवास सुरू होता. त्या वेळी भूतानच्या सीमेवर प्रवास करताना देशभर कोव्हिडच्या प्रादुर्भावामुळे ब्रेक घ्यावा लागला. त्या वेळी दीड वर्षे घरीच होतो. त्यानंतर लसीचे डोस घेऊन १५ ऑगस्ट २०२२ रोजी पुन्हा प्रवासाला सुरुवात झाली. यानंतर उत्तर भारताचा दौरा करून आता आम्ही महाराष्ट्रात पोहोचलो आहोत. या प्रवासात आम्ही मठ, मंदिरे, गुरुद्वारांत मुक्काम करतो. प्रवासाची ठरावीक वेळ निश्चित नसते. वातावरणाचा अंदाज घेत प्रवासाला सुरुवात करीत असून, सायंकाळपर्यंत प्रवास सुरू असतो,’ अशी माहिती डी. कृष्णकुमार यांनी दिली. ‘पालकांच्या निधनानंतर त्यांच्या फोटोला हार घालण्याऐवजी ते जिवंत असताना त्यांची सेवा केली पाहिजे. लहानपणापासून आपल्यासाठी कष्ट करणाऱ्या आई-वडिलांची वृद्धत्वामुळे आबाळ होणार नाही, याची मुलांनी काळजी घेतली पाहिजे,’ असे आवाहनही त्यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed