टाकळी जहागीर येथील मुक्ता बाभळे (६५) यांच्या घरात गुप्तधन असल्याची माहिती त्यांनी जवळच्या एका व्यक्तीला दिली. त्यानुसार बुधवारी मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास गुप्तधन काढण्यासाठी एक महाराज, १२ वर्षीय पायाळू बालक आणि चार मांत्रिक व्यक्ती या महिलेच्या घरी आले. घरात पूजापाठ मांडून त्या बालकाची देखील पूजा करण्यात आली आणि घरात धन कुठे आहे यासाठी त्याला चालायला लावले. मात्र सर्वकाही सुरळीत असतांना या अघोरी प्रकारची कुणकूण गावातील काही मंडळींना लागताच त्यांनी या बाबत पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांना भ्रमणध्वनी वरून माहिती दिली. पोलीस येईपर्यंत त्या महिलेच्या घरावर पाळत ठेवून बसले होते. मात्र घरात असलेल्या मांत्रिक आणि महिलेला घराबाहेरील हालचाल लक्षात येताच सर्वांनी पोलीस येण्याच्या आत तेथून पळ काढला.
पोलीस निरीक्षक यांच्यासह पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल होताच त्यांनी घरात मांडलेली पूजा व पूजेसाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याचा पंचनामा करून मुक्ता बाभळे या महिलेला तसेच महाराज सुखदेव पाटोरकर (भांडुप) यांना ताब्यात घेतले. या महिलेला विचारपूस केल्यानंतर तिने सचिन बोबडे याचे नाव घेतले. त्यानुसार पोलिसांनी लगेच गौरखेडा कुंभी गाव गाठून रात्री अडीच वाजताच्या सुमारास फरार झालेला आरोपी सचिन बोबडे याला ताब्यात घेतले. सचिन बोबडे याने पोलिसांसमक्ष या अघोरी कृत्याची कबुली देत यामध्ये समाविष्ट असलेल्या सर्व आरोपींची नावे सांगितली. व तपास पथक तेथूनच पुढील फरार आरोपी ताब्यात घेण्यासाठी भैसदेही (मध्यप्रदेश) येथे रवाना झाले आणि तेथून मुख्य आरोपी असलेला रामकिसन अखंडे याला ताब्यात घेतले. तेथून तिसरा मुख्य आरोपी तिवसा येथील सातरगाव येथे दडून बसला होता. पोलिसांच्या पथकाने तेथून रवी धिकार आणि त्या बारा वर्षीय बालकाला ताब्यात घेतले. रात्री दीड वाजता पासून सुरू झालेली धरपकड कार्यवाही सकाळी दहा वाजेपर्यंत चालली.
यामध्ये पोलीस निरीक्षक यांच्यासह ए. एस.आय राजू काळे, पोलीस हवालदार संजय खारोडे, चालक प्रवीण नवलकर आदी सहभागी होते. गुरुवारी सकाळी साडे दहा वाजता कार्यवाही करण्याची प्रक्रिया सुरू होती. प्रत्यक्षदर्शी रमेश रामदास गायगोले रा. टाकळी जहागीर यांच्या फिर्यादीवरून सहा आरोपींवर महाराष्ट्र जादूटोणा कायदा २०१३अंतर्गत कलम ३ व बालन्याय अधिनियम कलम ७५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपी अटक आहेत.
पोलिसांनी जागून काढली रात्र
धवारी रात्री गस्तीवर असतांना रात्री एक वाजताच्या दरम्यान त्यांना या घटनेसंदर्भात प्रत्यक्षदर्शींचा फोन आल्यानंतर तपासाची सूत्रे गतीने वाढवत सर्व आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी संपूर्ण रात्र जागून काढली आणि या अघोरी कृत्याला वेळेवर रोखण्यात यश मिळविले. पोलिसांनी केलेल्या या धाडसी कार्यवाहीबाबत सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.