• Mon. Nov 25th, 2024

    समूह शाळेमुळे सरकारी शाळांचं वाटोळं होणार, आता बलिदानाची वेळ, संघटना आक्रमक, सरकारचं पाऊल काय?

    समूह शाळेमुळे सरकारी शाळांचं वाटोळं होणार, आता बलिदानाची वेळ, संघटना आक्रमक, सरकारचं पाऊल काय?

    छत्रपती संभाजीनगर : राज्य सरकारच्या ‘शाळा दत्तक योजना’, ‘शाळा समूह योजना’ धोरणांमुळे सरकारी शाळांचे वाटोळं होणार आहे. सरकारी शाळांवाले आज जात्यात तर आपण सुपात आहोत. आता सगळ्यांनी बलिदान करण्याची वेळ आली, अशा भावना व्यक्त करत मराठवाड्यातील २५ पेक्षा अधिक शिक्षक, शिक्षकेतर संघटना एकत्र आल्या आहेत. ‘शैक्षणिक व्यासपीठ’ भरवित संघटनांनी राज्य सरकारसोबत संघर्ष करण्याचा निर्णय घेतला आहे. आता सगळ्यांनी बलिदान करण्याची वेळ आली.. सरकार धोरण रद्द करत नाही, तोपर्यंत लढा देण्याचा निर्णय संघटनांनी गुरुवारी बैठकीत घेतला.

    राज्य शासनाने सरकारी शाळांसाठी ‘दत्तक शाळा योजना’, ‘शाळा समूह योजना’, सरकारी नोकऱ्यांचे कंत्राटीकरण अशी धोरणे जाहीर केली. त्यावरून शिक्षण क्षेत्रात, शिक्षकांमध्ये संतापाची लाट आहे. सरकारी शाळांमधील शिक्षकांच्या आंदोलनानंतर अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर संघटना, संस्थाचालक संघटना निर्णयाविरोधात एकत्रित आल्या आहेत. ‘शैक्षणिक व्यासपीठ’द्वारे या संघटनांनी शिक्षण बचावचा नारा दिला आहे.

    समूह शाळा म्हणजे शिक्षणाची उलटी गंगा; शिक्षणतज्ज्ञांचा धोक्याचा इशारा
    छत्रपती संभाजीमध्ये गुरुवारी अशा २५ पेक्षा अधिक संघटनांचे प्रमुख, पदाधिकारी एकत्रित आले. वसंतराव नाईक महाविद्यालयात झालेल्या पहिल्या बैठकीत संघटनांनी धोरणाबाबत नाराजी व्यक्त केली. एकत्रित येत संघटना विविध टप्प्यात निर्णयांविरोधात रस्त्यावर उतरणार आहेत. यामध्ये शाळा बंद, धरणे, उपोषण करण्यावर निर्णय झाला. आज सरकारी शाळा जात्यात आहेत, आपण सुपात आहोत. या धोरणांमुळे शिक्षण क्षेत्रात अगणित बदल होतील, अनेकांनी यावेळी तीवृ शब्दात निर्णयाचा विरोध करत एकत्र लढा देण्याचा निर्णय घेतला.

    अडीच हजार शिक्षकांवर संक्रात? समूह शाळा प्रकल्पामुळे तीन जिल्ह्यांतील शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात
    ‘दत्तक शाळा योजना’, ‘शाळा समूह योजना’ अद्यादेशातून शिक्षण क्षेत्र मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे काहींनी मांडले. यावेळी शिक्षण संस्था महामंडळ, शिक्षकेतर महासंघ, मुख्याध्यापक संघ, शिक्षक क्रांती, शिक्षक सेना, मुप्टा, मराठवाडा शिक्षक संघ, राष्ट्रवादी शिक्षक संघटना, मेसा, कायम विनाअनुदान शाळा कृती समिती, स्वाभिमानी शिक्षक व शिक्षकेतर संघटना,शिक्षक भारती खासगी, अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना, दलीत पँथर शिक्षक संघटना, शिक्षक समिती, शिक्षक संघ, शिक्षक संघ शिवाजीराव पाटील गट, डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक संघटना, कास्ट्राईब शिक्षक संघटना, उर्दू शिक्षक संघटना, म.रा. अशासकीय व्होकेशन शिक्षकेतर कर्मचारी संघटना अशा विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *