पारडी येथील भाजीबाजार हा पूर्वीपासून चर्चेचा विषय राहिला आहे. पारडी मार्गावर भरणाऱ्या या बाजाराने वाहतुकीची कोंडी व्हायची. बरेचदा अपघातही घडायचे. त्यामुळे येथील विक्रेत्यांना मुख्य रस्त्याच्या खालील बाजूने असलेल्या सर्व्हिस रोडसदृश जागेवर हलविण्यात आले. हा रस्ताच दहनघाटात जातो. त्यामुळे या विक्रेत्यांचा बाजार थेट दहनघाटाच्या आतच भरत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, दहनघाटालगतच असलेल्या जागेवर बाजार विकसित करण्यात येणार आहे. याठिकाणी विक्रेत्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार होत्या.
दरम्यान, अनेक वर्षांपासून यावर काहीच झाले नाही. रविवारी आठवडी बाजार भरत असल्याने यादिवशी दुकानांची गर्दी वाढते. त्यामुळे दहनघाटाच्या प्रवेशद्वारावर तसेच आतील भागातसुद्धा विक्रेते त्यांची दुकाने थाटतात. मुख्य म्हणजे, जवळपास दुसरा भाजीबाजार नसल्याने नागरिकांना या बाजारातून भाजीपाला घ्यावा लागत आहे. यामुळे भविष्यात आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. शहरात आधीच आठवडी बाजारांना मिळणाऱ्या सुविधा व त्यामुळे निर्माण झालेल्या प्रश्नांवर तोडगा काढण्यात महापालिकेला अपयश आले आहे. त्यातच आता थेट स्मशानघाटात बाजार भरत असल्याने याठिकाणी जाऊन भाजी खरेदी कराव लागत असल्याच्या प्रकाराबद्दल नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
अनेक वर्षांपासून या भाजीविक्रेत्यांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दहनघाटालगतची जागा बाजारासाठी देण्यात आली होती. मात्र, अजूनही याचे काहीच झालेले नाही. प्रशासनाकडेही याचा पाठपुरावा केला असता त्याबाबत काहीच झाले नसल्याचे या भागातील माजी नगरसेवकांचे म्हणणे आहे.