• Mon. Nov 25th, 2024
    ‘महादेव बेटिंग ॲप’मुळे खळबळ; कर्ता करविता कोण? असे चालते काम, वाचा सविस्तर…

    म.टा.प्रतिनिधी, पुणे : ‘महादेव बेटिंग ॲप’ प्रकरणात सक्तवसुली संचालनालय अर्थात ‘ईडी’कडून सातत्याने कारवाई सुरू आहे. केंद्रीय तपास यंत्रणा ‘ॲप’शी संबंधित लोकांची चौकशी करीत आहेत. आतापर्यंत ‘ईडी’ने श्रद्धा कपूर, कपिल शर्मा, रणबीर कपूर यांच्यासह अनेक बॉलिवूड कलाकारांना चौकशीसाठी समन्स पाठवले आहे. काय आहे हे प्रकरण?

    कर्ता करविता कोण?

    – सौरभ चंद्राकर व रवी उप्पल या दोघांनी कंपनीची निर्मिती केली आणि ‘महादेव ॲप’ तयार करण्यात आले.

    – ‘ॲप’द्वारे नागरिकांना तीन पत्ती, पोकर, चान्स गेम, बॅडमिंटन, टेनिस आदी खेळांसाठी सट्टेबाजी करण्याची सुविधा पुरविण्यात आली.

    – या ‘ॲप’चे प्रमोशन करण्यासाठी बॉलिवूडमधील सेलिब्रिटी पुढे आले. अनेक दिग्गजांकडून त्याचे प्रमोशन करण्यात आले.

    मुंबईच्या वेशीवरील टोलबाबत मोठी बातमी: निर्णय सरकारच्याच हाती; मंत्रिमंडळाची भूमिका काय?
    असे आले उजेडात

    सौरभ चंद्राकर याच्या सुमारे दोनशे कोटींच्या शाही लग्नसोहळ्यात बॉलिवूडमधील अनेकांनी हजेरी लावली आणि काहींनी तर आपली अदाकारी सादर केली. या लग्नसोहळ्यामुळे बॉलिवूड, महादेव ॲप आणि हवालामार्फत कोट्यवधींची झालेली देवाणघेवाण तपास यंत्रणांच्या रडारवर आली आहे. या शाही लग्नसोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर रोखमध्ये व्यवहार झाला.

    असे चालते काम…

    – ‘महादेव बेटिंग ॲप’ने ग्राहकांना वेबसाइटवर किंवा व्हॉट्सॲपवरून खेळाच्या लिंक देण्यात आल्या.

    – त्या ‘लिंक’वर क्लिक केल्यानंतर कंपनीने यूझर आयडी देण्यात आले.

    – यूझर आयडी तयार झाल्यावर ग्राहकाला त्याच्या वॉलेटमध्ये पैसे भरावे लागत होते.

    – या वॉलेटमधून सट्टा सुरू झाला. पैसे जिंकले तर ग्राहकाला ठरल्यानुसार पैसे मिळत होते.

    – ‘ॲप’वरून वादंग निर्माण झाल्यानंतर कंपनीने आणखी काही ‘ॲप’ तयार करून त्याद्वारा व्यवहार केले.

    घोटाळा कसा?

    – ग्राहकांनी कंपनीच्या खात्यात दिलेले पैसे, हेच उत्पन्न असल्याचे सांगण्यात आले.

    – बेटिंगमधून ग्राहकाला पैसे मिळत होते. मात्र, ज्या खात्यातून हे पैसे मिळत होते. त्यासाठी बनावट ओळखपत्रांचा आधार घेण्यात आला.

    – वेगवेगळ्या प्रकारची शेकडो बँक खाती ॲपला जोडण्यात आली असून त्यातून सर्व आर्थिक व्यवहार केला जातो.

    – करोनाकाळात म्हणजे सन २०२०मध्ये ज्या वेळी ‘आयपीएल’चे सामने प्रेक्षकांविना खेळविले गेले, त्या वेळी महादेव ॲपने सट्टेबाजीत सुमारे दोन हजार कोटींची उलाढाल केल्याचा अंदाज आहे.

    बॉलिवूडचे कलाकार रडारावर

    बॉलिवूडमधील डझनापेक्षा अधिक अभिनेते आणि अभिनेत्री तपास यंत्रणांच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. अभिनेता रणबीर कपूर याच्यानंतर ‘ईडी’ने अभिनेता कपिल शर्मा, अभिनेत्री हिना खान, हुमा कुरेशी यांना चौकशीसाठी समन्स पाठवले आहे. याबरोबरच भारती सिंह, सनी लिओनी, आतिफ अस्लम, राहत फतेह अली खान, नुसरत भरूचा, कृष्णा अभिषेक, अली अजगर, विशाल ददलानी, टायगर श्रॉफ, नेहा कक्कर, ॲली अवराम, भाग्यश्री, पुलकित-कीर्ती यांचीही नावे चर्चेत आहेत. यातील काहींनी ॲपची जाहिरात केली, तर काही जण चंद्राकर याच्या लग्न आणि सक्सेस पार्टीमध्ये सहभागी झाल्याचे म्हटले जात आहे.

    छाप्यांचा इतिहास

    – प्राप्तिकर विभागाने सन २०२०मध्ये छत्तीसगडमध्ये अनेक व्यावसायिक, राजकीय व्यक्ती आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या घरावर छापे टाकले. चौकशीदरम्यान ‘महादेव ॲप’चे नाव पुढे आले.

    – ‘ईडी’ने ऑगस्ट २०२३ मध्ये महिन्यात छत्तीसगडचे सहायक उपनिरीक्षक चंद्रभूषण वर्मा, सतीश चंद्राकर, हवाला ऑपरेटर अनिल दम्मानी आणि सुनील दम्मानी यांना अटक केल्यानंतर पहिल्यांदा महादेव ॲपबाबत जाहीरपणे माहिती दिली.

    – कोलकाता, भोपाळ, मुंबईसह सुमारे ३९ शहरांमध्ये छापासत्र राबवले. ४१७ कोटींची मालमता हस्तगत केली. यामध्ये रोख रक्कम आणि इतर स्थावर मालमत्तांचा समावेश आहे.

    वनडे विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली ही गोष्ट, श्रीलंका-पाकिस्तान संघांच्या नावे अनोखा विक्रम

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed