• Sat. Sep 21st, 2024

नाशिकला ‘एमडी’चं फिरतं दप्तर; पुरवठ्यासाठी तरुणींचा वापर, या ठिकाणी विक्रीचा भरतोय बाजार

नाशिकला ‘एमडी’चं फिरतं दप्तर; पुरवठ्यासाठी तरुणींचा वापर, या ठिकाणी विक्रीचा भरतोय बाजार

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : गांजा, भांग, चरस व इतर नशेच्या तुलनेत मॅफेड्रॉन (एमडी) अधिक स्वस्त आणि सहज उपलब्ध होत असल्याने त्याच्या आहारी जाणाऱ्या तरुणाईचे प्रमाण शहरात वाढत असल्याची धक्कादायक माहिती आहे. एमडीच्या पुरवठ्यासाठी ‘माफिया’ हे त्यांच्या ‘सल्पायर्स’ पाठोपाठ महाविद्यालयीन तरुणींचाही वापर करीत आहेत. त्यांच्या दप्तरातून एमडी इतरत्र जात असून, महाविद्यालयासह छुप्या जागेत विक्री होत आहे. त्यासंदर्भातील माहितीनुसार नाशिक पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली आहे.

नाशिकमध्ये एकापाठोपाठ दोन कारखाने उद्ध्वस्त करून पोलिसांनी शेकडो किलो एमडी हस्तगत केल्याने खळबळ उडाली आहे. नाशिक शहरातील अनेक जण एमडीच्या आहारी जात असल्याची माहिती पोलिस तपासात समोर येत आहे. त्यासाठी नाशिक पोलिस आयुक्तालयाने व्यसनमुक्ती केंद्रातून एमडीची नशा करणाऱ्यांची माहिती घेतली आहे. काही शाळा व महाविद्यालयांमध्ये गोपनीय माहिती काढून विद्यार्थ्यांच्या हालचालींवरही लक्ष ठेवण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील ड्रग्ज विक्री व वाहतुकीला आळा लागण्याची शक्यता आहे. ‘ड्रग्ज सल्पायर्स’लादेखील अटक करून शहरातील अमली पदार्थांचा विळखा रोखण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

इथे भरतोय ‘बाजार’

शहर : वडाळा गाव, वडाळा नाका, अशोका मार्ग यासह काही महाविद्यालयांबाहेर, पानटपऱ्या, कॅफेंबाहेर एमडीचे व्यवहार होतात
पंचवटी : तपोवन, अमृतधाम, आडगाव परिसरातील टपऱ्या, मोकळ्या जागा
नाशिकरोड : शिंदे गाव, मुक्तिधाम, रेल्वे स्टेशन परिसर, सैलानी बाबा रोड, एकलहरे, उपनगर, महाविद्यालयांबाहेर
सिडको : चुंचाळे, म्हाडा वसाहती, पाथर्डी गाव परिसर व इतरत्र

एमडीची विक्री

किंमत : अर्धा ते १ ग्रॅम : दीड ते दोन हजार रुपये
पाऊच : अर्धा ग्रॅम, ०.७५ ग्रॅम, १ ग्रॅमपर्यंत

‘ड्रग्ज रेटकार्ड’

एमडी १,५०० ते २००० रुपये (प्रतिग्रॅम)
गांजा १०० ते २०० रुपये (पुडी)
भांग २० ते १०० रुपये (पेढा, बंटा)

‘त्यांनी’ अड्डे बदलले!

काही वर्षांपूर्वी तपोवन, उड्डाणपुलाखाली, भुयारी मार्गात, गोदातिरी, गार्डनमध्ये व इतर मोकळ्या जागेत गांजा, भांग, चरस व शक्यतो एमडीची विक्री व्हायची. परंतु, पोलिसांनी अनेकदा संशयितांवर कारवाई केल्याने ‘त्यांनी’ हे अड्डे बदलले आहेत. गंभीर बाब म्हणजे, नाशिक शहरासह जिल्ह्यात गांजापेक्षा एमडी सहज उपलब्ध होत असल्याने, त्याचा वापर व विक्री वाढल्याचे समजते. त्यामुळे अतिशय गोपनीय पद्धतीने एका ठिकाणाहून दुसरीकडे नेत ड्रग्ज दिले जातात. खरेदीदारावर विश्वास संपादित झाल्याशिवाय व्यवहार होत नाही. सतत ‘लोकेशन’ बदलल्यानंतर भलत्याच ठिकाणी हे ड्रग्ज सोयीस्कररीत्या समोरच्यापर्यंत पोहोचतात. त्यामुळे पोलिसांनाही संशयितांचे ‘नेटवर्क’ शोधणे काहीसे जिकिरीचे होत आहे.
ड्रग्ज म्हणजे नेमकं काय? कोणत्या अंमली पदार्थांचं सेवन अधिक? लक्षणं आणि दुष्परिणाम जाणून घ्या सविस्तर
…अशी ठरते किंमत?

अमली पदार्थांचे दर हे त्याची गुणवत्ता, मागणी आणि पुरवठा या आधारावर ठरतात. ‘एमडी’मध्ये भेसळ असल्यास एक हजार रुपयांपर्यंत विक्री होते. परंतु, चांगल्या दर्जाचे ‘एमडी’ दीड ते दोन हजारापेक्षा जास्त किमतीला विक्री होते. पुरवठादार, मध्यस्थी आणि खरेदी करणारा यांच्यातील ओळख व विश्वास त्यावर कोणत्या दर्जाचे ड्रग्ज आणि किती किमतीला द्यायचे हे ठरते. या स्वरूपाची माहिती पोलिसांच्या तपासात वेळोवेळी समोर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed