दोन-चार वर्षांपूर्वी मुंबईत सोनसाखळी चोरांनी धमाकूळ घातला होता. या चोरांवर नियंत्रण मिळविण्यात पोलिसांना यश आले, मात्र त्यांची जागा आता मोबाइलचोरांनी घेतली आहे. रेल्वेमध्ये, बसप्रवास, ठिकठिकाणी होणारी गर्दी, तसेच रस्त्याच्या कडेने चालणाऱ्या नागरिकांचे मोबाइल दुचाकीवरून हिसकावण्याचे प्रकार वाढले आहेत. मुंबईत दरवर्षी साधारण ४५ ते ५० हजार मोबाइल गहाळ होतात, हरवतात, चोरीला जातात. वाढत्या मोबाइलचोरीची दखल घेऊन राष्ट्रीय पातळीवरही सन २०१९मध्ये सीईआयआर ही प्रणाली कार्यन्वित करण्यात आली. तेव्हापासून आत्तापर्यंत संपूर्ण देशाची पोलिस यंत्रणा मोबाइल शोधण्यासाठी या प्रणालीचा वापर करीत आहेत. मुंबईतही एका विभागापुरता मर्यादित असलेली ही प्रणाली संपूर्ण मुंबईत कार्यान्वित असून मुंबई पोलिसांनी सुमारे ६० हजार मोबाइल ब्लॉक केले आहेत. ब्लॉक केलेले १७ हजार ४५० मोबाइल शोधून तक्रारदारांना परत करण्यात आले आहेत.
अशी काम करते प्रणाली
मुंबई पोलिसांकडे मोबाइलचोरी किंवा मोबाइल हरवल्याची तक्रार केल्यानंतर त्याआधारे सीईआयआर प्रणालीवर त्याची नोंद केली जाते. मोबाइल क्रमांक, मोबाइल कंपनी आणि मॉडेल याची नोंद झाल्यावर कुणालाही हा मोबाइल अन्य सिमकार्ड टाकून वापरता येत नाही. चोरीला गेलेला किंवा गहाळ झालेल्या मोबाइलचा वापर कुणी अन्य व्यक्तीने केल्यास त्याची माहिती पोलिसांना मिळते. हा मोबाइल कोणत्या क्रमांकावरून वापरला जात आहे, याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस वापरकर्त्यास शोधून काढतात.
कुरिअरने येतात मोबाइल
चोरीचा किंवा गहाळ मोबाइल वापरणाऱ्याचा मोबाइल क्रमांक मिळताच पोलिस त्यावर संपर्क साधतात. आपण वापरत असलेला मोबाइल चोरीचा असल्याची माहिती देऊन तो मोबाइल पोलिस ठाण्यात आणून देण्यास सांगितले जाते. दुकानात किंवा अन्य व्यक्तीकडून मोबाइल फोन खरेदी केलेली सर्वसामान्य व्यक्ती असेल तर मोबाइल जमा करतात. चोर, तसेच पोलिस ठाण्यामध्ये येण्यास घाबरणारे कुरिअरमार्फत मोबाइल फोन पोलिसांना पाठवतात.
पोलिस ठाण्यात न जाता करा तक्रार
– मुंबई पोलिसांच्या mumbaipolice.gov.in या वेबसाइटवर जा.
– वेबसाइटवर आम्हाला कळवा/report us हा पर्याय निवडा
– यामध्ये हरवले-सापडले/ Lost-Found यावर क्लिक करा
– मोबाइल, तसेच अन्य हरवलेल्या दस्तावेजाचा तपशील भरा
– पोलिस ठाणे निवडून वैयक्तिक तपशील, हरवल्याचे ठिकाण नोंदवा
– सर्व माहिती भरून जमा केल्यास हरवल्याचे प्रमाणपत्र/तक्रार प्रत तयार होते
– याबाबतची माहिती निवडलेल्या पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचते
– प्रमाणपत्राची प्रत सादर करून आपल्याला त्याच क्रमांकाचे सिमकार्ड व अन्य दस्तावेज मिळवता येतो
स्वतः करा मोबाइल ब्लॉक
– मुंबई पोलिसांच्या वेबसाइटवरच https://www.ceir.gov.in/Home/index.jsp ही लिंक देण्यात आली आहे
– प्रमाणपत्र/तक्रारीची प्रत मिळाल्यावर थेट www.ceir.gov.in या वेबसाइटवर जाऊ शकता
– ब्लॉक मोबाइल, अनब्लॉक मोबाइल, चेक रिक्वेस्ट स्टेट्स असे तीन पर्याय देण्यात आले आहेत
– ब्लॉक मोबाइल हा पर्याय निवडून पोलिस तक्रार क्रमांक आणि इतर तपशील भरावा
– यानंतर आलेला ओटीपी टाकून अर्ज जमा केल्यास मोबाइल ब्लॉक होतो
– ब्लॉक केलेल्या मोबाइलमध्ये अन्य सिमकार्ड टाकल्यास लगेच मोबाइलक्रमांकावर, मेलवर अलर्ट येतो
– संबंधित पोलिस ठाण्याला तर कोणत्या क्रमांकाचे सिमकार्ड टाकले हेही समजते
या कागदपत्रांचा समावेश
गहाळ किंवा हरविल्याचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी मोबाइलसोबतच इतर काही दस्तावेज, ओळखपत्र यांचा मुंबई पोलिसांच्या वेबसाइटवर समावेश करण्यात आला आहे. पॅन कार्ड, आधारकार्ड, मतदार ओळखपत्र, वाहनचालक परवाना, शैक्षणिक प्रमाणपत्र, शिधापत्रिका आणि इतर कागदपत्रे गहाळ झाल्यास ऑनलाइन तक्रार करून तक्रार प्रत मिळवता येते.