• Mon. Nov 25th, 2024

    नागपूर जिल्ह्यातील पिकाच्या नुकसानाची महसूलमंत्र्यांकडून पाहणी

    ByMH LIVE NEWS

    Oct 8, 2023
    नागपूर जिल्ह्यातील पिकाच्या नुकसानाची महसूलमंत्र्यांकडून पाहणी

    नागपूर, दि.7 : सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच पिकांवर आलेल्या रोगामुळे नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानाची प्रत्यक्ष बांधावर जाऊन महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज पाहणी केली. परिस्थितीचा आढावा घेतला.

    अकोला येथील आपला नियोजित कार्यक्रम आटपून त्यांनी दुपारी नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी, काटोल, पावनवाडी, पारडसिंगा येथील नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला.

    नागपूर जिल्ह्यामध्ये सप्टेंबर महिन्यात ढगफुटीसदृश झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. यापूर्वी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्ह्याचा दौरा केला होता. आज महसूल मंत्र्यांनी ग्रामीण भागात जाऊन नुकसानाची पाहणी केली.

    जिल्ह्यात प्रामुख्याने सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रत्येक ठिकाणच्या शेतकऱ्यांनी सोयाबीनवर आलेल्या ‘पिवळ्या मोझॉक व्हायरस’ या रोगामुळे झालेल्या नुकसानाची माहिती महसूल मंत्र्यांना दिली. कीड नियंत्रणासाठी योग्य ती उपाययोजना करण्याबाबत त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली.

    जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाल्याची खात्री त्यांनी यावेळी केली. पंचनामे राहिले असतील तर पूर्ण केले जातील असेही त्यांनी सांगितले.

    पावनवाडी येथील शेतकरी भगवान कमेरीया यांच्या  शेतातील मोसंबी पीकाची पाहणी केली. संत्रा व मोसंबी पिकांच्या वाणांचे संशोधन करण्यात यावे, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.

    काटोल तालुक्यातील वडली येथील ढोक महाजन मठ येथे भेट देऊन परिसराची पाहणी केली. तसेच पारडसिंगा येथील अनुसया माता मंदिर येथे भेट देऊन दर्शन घेतले.

    उद्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी दुपारी जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्ह्यातील नुकसानाचा आढावा ते घेणार आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *