• Mon. Nov 25th, 2024
    जोडपं रुळ ओलांडत होतं; अचानक ट्रेन आली, पत्नी रेल्वेखाली येणार होती, पती मदतीला धावला, मात्र…

    जळगाव: अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त आयोजित भंडाऱ्यांचा कार्यक्रम आटोपून पती पत्नी आणि त्यांच्यासोबत एक महिला असे तिघेजण घराकडे निघाले होते. जवळचा मार्ग म्हणून या मार्गावरील रेल्वे रुळ ओलांडत असताना अचानक एक्सप्रेस आली. यात दाम्पत्यासोबत असलेली महिला तसेच पत्नीला वाचविताना पती असे दोघे रेल्वेखाली आल्याने त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. पाचोरा तालुक्यातील परधाडे ते माहेजी रेल्वे स्थानकादरम्यानच्या रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे.
    मला आरतीला बोलवा, तोपर्यंत मी जेवण करतो; मुलाने शेजारी सांगितलं अन् घरी गेला, नंतर जे घडलं त्यानं…
    मिळालेल्या माहितीनुसार, रत्‍नाबाई माधवराव पाटील (६१, रा. दुसखेडा ता. पाचोरा) आणि अशोक झेंडू पाटील (६०, रा. पहाण ता. पाचोरा) अशी मयत दोघांची नावे आहेत. पाचोरा तालुक्यातील पहाण येथील रहिवासी अशोक झेंडू पाटील हे त्यांची पत्नी बेबाबाई आणि सोबत दुसखेडा या गावातील रत्नाबाई माधव पाटील असे तिघे जण रविवारी दुसखेडा येथुन परधाडे येथे अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पायी गेले होते. सप्ताहानिमित्त भंडाऱ्याचा कार्यक्रम होता. तो आटोपून रत्‍नाबाई पाटील, अशोक पाटील आणि त्यांची पत्नी बेबाबाई पाटील असे तीन जण परधाडेहून दुसखेडा गावाकडे जवळच्या मार्गाने पायीच निघाले होते.

    वाटेत रेल्वे रुळ आहे. याच ठिकाणाहून कामायनी एक्सप्रेस ही गाडी जात होती. या दरम्यान तिघेही जण रेल्वे रुळ ओलांडत होते. बेबाबाई रेल्वेखाली येईल असे लक्षात आल्याने त्यांचे पती अशोक पाटील हे त्यांना वाचविण्यासाठी धावले, तर यात अशोक पाटील तसेच सोबतच्या रत्नाबाई हे दोघे एक्सप्रेस रेल्वे गाडीखाली सापडले. यात दोघांना जागीच मृत्यू झाला. आपल्या डोळ्यासमोर पतीचा मृत्यू पाहून बेबाबाई यांना मोठा धक्का बसला होता. त्या सुन्न झाल्या होत्या. या घटनेत बेबाबाई जखमी झाल्या असून त्यांच्यावर दवाखान्यात उपचार सुरु आहेत.

    भारताविरोधात बोलला की ठोकला, मोसादपेक्षाही थरारक कारवाया नेमक्या कुणाकडून?

    घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल भगवान बडगुजर यांनी तात्काळ रुग्णवाहिका सोबत घेत घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करत याठिकाणाहून रुग्णवाहिका चालक अमोल पाटील आणि किशोर लोहार यांच्या मदतीने पोलिसांनी दोघांचे मृतदेह हे वेगवेगळ्या रुग्णवाहिकांमधून पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. घटनेप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक तुषार विसपुते हे करीत आहेत. एकाच घटनेत दोन जणांच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed