• Mon. Nov 25th, 2024

    पुनर्वसनाचा पर्याय देऊनच अतिक्रमणे हटवा – पैठण येथील अतिक्रमणांबाबत पालकमंत्री भुमरे यांचे यंत्रणेला निर्देश

    ByMH LIVE NEWS

    Sep 25, 2023
    पुनर्वसनाचा पर्याय देऊनच अतिक्रमणे हटवा – पैठण येथील अतिक्रमणांबाबत पालकमंत्री भुमरे यांचे यंत्रणेला निर्देश

    छत्रपती संभाजीनगर,दि.25 (जिमाका) – पैठण शहरात अतिक्रमणधारकांना हटविण्याआधी त्यांचे नियमानुसार पुनर्वसन करावे असे,निर्देश पालकमंत्री तथा राज्याचे रोहोयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी आज येथे संबंधित यंत्रणेला दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात पैठण तालुक्यातील विविध विकास कामाचा आढावा पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली  घेण्यात आला.

     मुख्यमंत्री ग्रामसडक योजना ,क्रीडा संकुलाच्या सोयीसुविधा,स्मशानभूमी जागा उपलब्धता इ.आढावा यावेळी घेण्यात आला.

    जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन प्रभोदय मुळे, उपजिल्हाधिकारी रोहयो अर्चना खेतमाळीस, उपविभागीय अधिकारी अधिकारी पैठण सोहम वायाळ, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, नगरपालिका पैठण मुख्याधिकारी नंदकिशोर भोंबे, भूमी अभिलेख अधीक्षक डाहोरे, कार्यकारी अभियंता जायकवाडी प्रकल्प जाधव, क्रीडा अधिकारी लता लोंढे, महावितरणचे अधीक्षक अभियंता दरोली, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे अभियंता खडेकर यांच्यासह संबंधित विभागाचे विभाग प्रमुख या बैठकीस उपस्थित होते.

    पैठण शहरातील शासकीय जागेवरील अतिक्रमण नियमानुसार निष्कषित करण्याची कारवाई तपासणी करून करावी. तसेच  नागरिकांच्या पुनर्वसनासाठी पर्यायी जागा उपलब्ध करण्यासाठी समितीने विविध तपासण्या कराव्या अशी सूचना पालकमंत्री संदिपान भूमरे यांनी दिल्या. नाथ मंदिराजवळील असलेल्या जागेवर नागरिकांच्या अतिक्रमणाची पडताळणी करुन त्यांना इतरत्र मालकीचे घर किंवा जागा आहे किंवा नाही हे तपासून प्रधानमंत्री आवास योजनाचा लाभ देण्यात यावी. जागेच्या मोजणीसाठी संबंधित उपविभागीय  अधिकारी, तहसीलदार पुनर्वसन अधिकारी, भूमी अभिलेख कार्यालयाने ही संयुक्त कारवाई  करावी व अहवाल सादर करावा.  ही कारवाई पंधरा दिवसाच्या आत करुन उर्वरीत प्रस्ताव शासनाकडे  सादर करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

    कोर्टसमोरील अतिक्रमण काढण्याबरोबरच क्रीडा संकुलाच्या मधून जाणाऱ्या रस्त्याच्या बाबतीत केलेले अतिक्रमणाविषयी आढावा घेण्यात आला.

    ब्रम्हगव्हाण उपसा सिंचन प्रकल्पाच्या भूसंपादनाचा प्रस्ताव व मावेजासंबंधी असलेल्या नवीन तरतुदीनुसार भूमी अभिलेख विभागाने मोजणी करावी व प्रकल्पबाधित नागरिकांना निधी उपलब्ध करून देण्याबाबतची कारवाई करण्याबाबत सांगण्यात आले.

    महावितरण अंतर्गत ग्रामीण भागात शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी वीज जोडणीस डीपी ची उपलब्धता आणि बनोटी वीज जोडणी प्रकल्प यामध्ये ३३ केव्हीचे ट्रांसफार्मर उपलब्ध करण्याबाबतचे दाखल केलेले प्रस्ताव आणि शेतकऱ्यांची मागणी आणि त्यांना  वितरण केलेल्या ट्रांसफार्मरची माहिती सादर करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.यावेळी लोकप्रतिनिधीची डी.पी.मागणी केलेल्या प्रस्तावाचा विचार करुन डीपी वितरीत कराव्यात.

    ग्रामसडक योजनेतील काम डिसेंबर अखरेपर्यंत पूर्ण करा.

    मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत रहाटगाव, पाचलगाव येथील रस्त्याचे कामाचे सद्यस्थिती टप्पा – 4 बाबतच्या कामाचा आढावा पालकमंत्र्यांनी घेतला. डिसेंबर अखेरपर्यंत या रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे सांगितले.

    क्रीडा संकुलातील सुविधा गुणवत्तापूर्ण करावी.

    शहरातील विभागीय क्रीडा संकुलातील सिंथेटिक ट्रॅकचा आढावा  घेण्यात आला. येत्या दि.5 ऑक्टोबर पर्यंत त्याचे उद्घाटन करण्याचे नियोजन क्रीडा विभागाने करावे, अशा सूचना हॉकीटर्फ, बॅडमिंटन कोर्ट आणि येथे लाईट  आणि फ्लोरिंगबाबतही आढावा घेण्यात आला. क्रीडा संकुलातील भाडे तत्त्वावर दिलेल्या गाळेधारकांपैकी भाडे थकबाकीदाराकडून रक्कम वसुली करण्याबाबतही त्यांनी सूचना दिली.

    स्मशानभूमीसाठी जागा तातडीने उपलब्ध करुन द्यावी.

    पिंपळवाडी, मुधोळवाडी गावांमध्ये स्मशानभूमी उपलब्ध नाही. त्या गावात स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करण्याबाबतचा प्रस्ताव 9 ऑक्टोबर पूर्वी  तयार करून स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी असे पालकमंत्री भूमरे यांनी सांगितले.

    पैठण तालुक्यातील विविध विकासकामांच्या बैठकीनंतर संबंधित गावातील नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या मागणीनुसार स्माशनभूमी साठी जागा, अतिक्रमणाचा प्रश्न इतर सुविधा उपलब्ध करण्याबाबतही पालकमंत्री यांनी आश्वस्त केले.

    000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *