– मध्यरात्री सुरू झालेल्या या जलप्रलयाने नागपूरकर झोपेतून खडबडून जागे झाले. धडकी भरवणारा कडकडाट आणि दिसणारा लखलखाट पाहून कुठेतरी वीज कोसळली असणार, असा अंदाज अनेकांनी व्यक्त केला. मात्र, थोड्या वेळात ओसरेल पाऊस, म्हणत झोपी गेलेल्या नागरिकांना सकाळी ‘पाऊस आपल्या दारी’चा प्रत्यय आला.
-‘न भुतो’ अशा स्वरूपाच्या जलप्रलयाने रस्त्यांना नदीचे स्वरूप आले, घराघरांत पाणी शिरले, दुचाकी-चारचाकी वाहने शोधावी लागली, बेसमेंटमध्ये जलतरण तलाव तयार झालेत, सखोल वस्त्यांमध्ये बोटी लावून लोकांना घरातून बाहेर काढावे लागले.
-कायम रहदारीचा असणाऱ्या सीताबर्डी आणि पंचशील चौकात कधी नव्हे इतके पाणी साचले. या दोन्ही चौकांत राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या सहकार्याने लोकांना हलविण्यात आले. विदर्भ साहित्य संघाच्या संकुलातील तळमजल्यावरील दुकानांमध्ये पाणी शिरल्याने लाखोंचे नुकसान झाले.
-डागा लेआउट, कॉर्पोरेशन कॉलनी येथे अंबाझरी तलावाच्या ओव्हरफ्लोमुळे घरातील फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्सची उपकरणे, दुचाकी-चारचाकी गाड्यांचे मोठे नुकसान झाले. धंतोली परिसरातील तळमजल्यावरील कम्प्युटर आणि मोबाइलच्या दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे कोट्यवधीचे व्यावसायिक नुकसान व्यापाऱ्यांना सोसावे लागणार आहे.
-झाशी राणी चौक ते सीताबर्डी मेट्रो इंटरचेंज जाणाऱ्या मार्गावरून नदीसदृश चित्र होते. नागपूरच्या आरबीआय क्वार्टरमध्येदेखील पाणी घुसले होते. गांधीनगर येथील नाग नदीची सुरक्षा भिंत कोसळल्याने अनेक घरांत पाणी घुसले. यामुळे नागरिकांनी सुरक्षित स्थळी असरा घेतला. धीरन कन्या शाळेजवळील नाला खचला, रस्तादेखील वाहून गेला.
नाग नदीला पूर, मोरभवन पाण्यात
शहरात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने नाग नदीला पूर आला. काही भागांत नाग नदीकाठच्या घरांमध्ये पुराचे पाणी शिरले. मध्यरात्री नागपूर शहराला मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले. वाडी येथील हजारी यांच्या घराची सुरक्षाभिंत जमीनदोस्त झाली. सीताबर्डी येथील मोरभवन बस स्थानकात अडकलेल्या बसचालक-वाहकांना सुरक्षितस्थळी पोहोचविण्यात आले. मोरभवन येथे सुमारे १० ते १२ बस पूर्णपणे पाण्याखाली होत्या.