गेल्या वर्षभरात गाजलेल्या ज्वलंत विषयांवर ठाण्यातील सार्वजनिक मंडळांनी यंदाही देखाव्यातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. उत्सवाला पर्यावरणाची जोड देत ‘हरवलेली माणुसकी’, ‘बदलत चाललेली तरुणाई’, ‘महादेवाच्या रूपातील गणेशमूर्ती’, छत्रपती शिवाजी महाराज यांची महती सांगणारा देखावा अशा विविध विषयांबाबत गणेशक्तांचे प्रबोधन केले जाणार आहे. दरवर्षी समाजप्रबोधनाचे विषय घेत चलचित्र साकारणाऱ्या पोलिस मुख्यालय, प्राथमिक शाळा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने ‘गुंतता हृदय हे’ हा देखावा साकारला आहे. सर्वसामान्यांमधील वाढणारे हृदयविकाराचे प्रमाण आणि उपाययोजना याबाबत मंडळाने चलचित्राद्वारे प्रबोधन करण्याचा प्रयत्न केल्याचे हा देखावा साकारणारे लेखक व कला दिग्दर्शक भालचंद्र (भाई) देसाई यांनी सांगितले.
शिवाईनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा ‘हरवलेली माणुसकी’ या विषयावर देखावा साकारला असून यामध्ये नवी पिढी कशी आई-वडिलांची जबाबदारी झटकत त्यांना आश्रमात सोडतात, वंशाला दिवा म्हणणारी समाजातील लोकांची मानसिकता, शिक्षकांना न दिला जाणारा आदर अशा विषयांवर भाष्य करणारा देखावा साकारला आहे. तसेच, यशोधन मंडळाच्या वतीने यंदा महादेवाच्या रूपातील गणेशमूर्ती आणि गुंफा साकारण्यात आली आहे. तर, श्रीरंग सहनिवास गणेशोत्सव मंडळाने यंदा इतिहासाला उजळा देण्याचा प्रयत्न केला आहे. ‘तुमची आमची ओळख काय, जय भवानी जय शिवराय’ या देखाव्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी सहा मिनिटांचे चलचित्र साकारले आहे. याचे लेखन व दिग्दर्शन हे अभिनेता विजू माने यांनी केल्याची माहिती मंडळाचे प्रमोद सावंत यांनी दिली. तर, ‘वागळे’मधील श्रीनगर परिसरात असलेल्या बाळ मित्र मंडळाने ‘बदलत चालेली तरुणाई’ या विषयावर देखावा सादर करत असताना वर्षानुवर्षे सुरू असलेल्या परंपरा संस्कृतीचा तरुणाईला विसर पडत आहे. आपल्या रुढी-परंपरा व संस्कृती जपली पाहिजे, असा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.
काजूवाडीत प्रति पंढरपूर
दरवर्षी भव्यदिव्य मंदिर आणि काल्पनिक महाल साकारणाऱ्या काजूवाडी-वैतीनगर रहिवासी मित्र मंडळाचा ‘काजूवाडीचा राजा’ यंदा प्रति पंढरपूर मंदिरात विराजमान झाला आहे. याठिकाणी भव्य दिव्य प्रति पंढरपूर साकारल्याने काजूवाडी परिसर विठ्ठलमय झाला आहे. विविध सामाजिक उपक्रमही मंडळाच्या वतीने राबवले जात असल्याचे मंडळाचे अध्यक्ष, माजी महापौर अशोक वैती यांनी सांगितले. तर, ‘ठाण्याचा राजा’ अशी ओळख असलेल्या पाचपाखाडी येथील नरवीर तानाजी मित्र मंडळानेही आकर्षक काल्पनिक महाल साकारला असून डोळ्याचे पारणे फेडणारी रोषणाई पाहण्यासाठी गणेशभक्तांची याठिकाणी गर्दी उसळत आहे.
उंचच उंच मूर्ती ‘वागळे इस्टेट’ची शान
मुंबईतील उंचच उंच गणेशमूर्तींप्रमाणे ठाण्यातही वागळे इस्टेट येथील विविध मंडळांमध्ये १५ ते २० फुटी गणराय विराजमान झाले असून गणेशभक्त या मूर्ती पाहण्यासाठी रात्री उशिरापर्यंत गर्दी करतात. यामध्ये किसननगर येथील ठाण्याचा महाराजा, राजा किसनगरचा, जय बजरंग बाल मित्र मंडळाचा वागळेचा राजा, श्रीनगर येथील वागळेचा विघ्नहर्ता अशाममंडळांच्या मूर्तींचा समावेश आहे.