या दुर्घटनेत राजेश श्रीवास्तव यांचादेखील मृत्यू झाला. ५४ वर्षीय राजेश हे काटेमानिवली परिसरात वास्तव्यास होते. या परिसरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात त्यांचा पुढाकार असे. त्यांचा भाऊ विवेकदेखील याच कंपनीत वेगळ्या विभागात कामाला आहे. त्यांनीच कुटुंबीयांना राजेशच्या मृत्यूची कल्पना दिली. राजेश यांच्या डोक्याचा आणि शरीराचा काही भाग सापडल्याने त्यांच्या मृतदेहाची ओळख पटली. राजेश यांना दोन मुली व एक मुलगा आहे. त्यांच्या मोठ्या मुलीचे लग्न ठरल्याची माहिती त्यांच्या भावाने दिली. मात्र तिचे लग्न त्यांना पाहता येणार नाही हे सांगताना त्यांचे डोळे पाणावले होते.
अनंता यादव हे भिवंडीतील भातसा परिसरात राहत असून त्यांना दोन मुली आहेत. मागील २० वर्षांपासून ते कंपनीत काम करत असून घटनेची माहिती मिळताच त्यांच्या नातेवाइकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र बराच वेळ त्यांना कोणतीच माहिती मिळत नव्हती. अनंता यांचा शोध लागत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. यामुळे त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेच्या वेळी ते टँकर भरत असल्याचे काही कर्मचाऱ्यांनी सांगितले. अन्य दोन बेपत्ता कर्मचाऱ्यांचा शोध लागत नसल्याने स्फोटानंतर साचलेल्या राखेच्या ढिगाऱ्यातून काही नमुने घेऊन ते डीएनए तपासणीसाठी धाडण्यात आले आहेत.
कंपनीच्या आवारात नातेवाइकांचा आक्रोश
सेंच्युरी रेयॉन कंपनीत भीषण स्फोट झाल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले आणि कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाइकांनी कंपनीकडे धाव घेतली. मात्र कंपनीचे प्रवेशद्वार बंद करण्यात आल्याने नातेवाइकांना कोणतीच माहिती मिळत नव्हती. साहजिकच हे सर्वजण हवालदिल झाले होते. मृत कर्मचाऱ्याचे नातेवाईकदेखील कंपनीत काम करत असल्याने या नातेवाइकांनी आपल्या कुटुंबीयांना दुर्घटनेची माहिती दिली. नातेवाइकांचा आक्रोश वाढल्यानंतर कंपनी प्रशासनाने मृत आणि बेपत्ता कर्मचाऱ्यांच्या नातेवाइकांना माहिती देत त्यांना शांत केले.
या दुर्घटनेची माहिती मिळताच नातेवाइकांनी रुग्णालयात गर्दी केली होती. घटनास्थळासह कंपनीच्या आवारात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आल्याने रुग्णालयाच्या आवारात प्रचंड गर्दी उसळली होती. रात्री उशिरापर्यंत अनंता जाधव आणि पवन यादव या दोन कर्मचाऱ्यांचा शोध लागलेला नव्हता. यामुळे त्यांचे नातेवाईक पोलिस आणि कामगार युनियनच्या नेत्यांना विनवणी करताना दिसले.