ऑगस्ट महिना संपूर्ण कोरडा गेल्यानंतर सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस होईल अशी अपेक्षा होती. मात्र, ती फोल ठरली. अखेर गणरायाच्या आगमनाबरोबर पावसाने पुन्हा आगमन केले. त्यामुळे दोन तीन दिवसांपासून पुणे शहरासह धरण परिसरात पावसाने हजेरी लावली आहे. धरण परिसरात संततधार पाऊस होत असल्याने धरणातील पाण्याची पातळी वाढू लागली आहे.
टेमघर, पानशेत आणि वरसगाव धरणात दोन दिवसांपासून संततधार पाऊस होत आहे. मात्र, शनिवारी या धरणांमध्ये पावसाचे तुरळक प्रमाण होते. खडकवासला धरणात दोन मिलीमीटर, पानशेतमध्य एक तर टेमघर धरणात ४५ मिलीमीटर एवढा पाऊस झाला. तर वरसगाव धरणात पाऊस झाला नसल्याची नोंद जलसंपदा विभागाने केली आहे.
खडकवासला प्रकल्पातील वरसागव, पानशेत ही दोन्ही धरणे शंभर टक्के फुल्ल झाली आहेत. टेमघर धरण आता ७६ टक्क्यांवर आहे. हा पाऊस आणखी राहिल्यास टेमघर धरण भरल्यास १०० टक्के प्रकल्प फुल्ल होण्याची शक्यता आहे. मुठा खोऱ्यातील खडकवासला प्रकल्पात सध्या २७.७४ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा उपलब्ध आहे. म्हणजेच सध्या ९५.१६ टक्क्यांवर पाणीसाठा पोहोचला आहे. गेल्या वर्षी हा पाणीसाठा २९.१५ टीएमसी म्हणजेच १०० टक्क्यांवर होता. नीरा खोऱ्यातील ४३.२८ टीएमसी (८९.५४टक्के) , तसेच एकूण भीमा खोऱ्यात १४० टीएमसी म्हणजेच ७० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. टाटाच्या धरण प्रकल्पातील मुळशी धरणातही पावसाचा जोर पाहता हे धरण भरल्याने त्यातून विसर्ग सोडण्यात आला आहे.
दरम्यान, शनिवारी दिवसभरात शहरात पाऊस झाला आहे. मात्र, धरणात फारसा पाऊस झाला नाही. पुढील आठ दिवस असाच पाऊस झाल्यास खडकवासला प्रकल्प शंभर टक्के भरू शकेल. सध्या पानशेत, वरसगाव धरणात दोन दिवसांपासून संततधार पाऊस झाला. त्यामुळे धरणातून पाणी काही प्रमाणात विसर्ग करण्यात आले आहे, असे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
धरणक्षेत्रातील पाणीसाठा (टीएमसीमध्ये)
धरण पाणीसाठा टक्के
खडकवासला: १.४४ ७२.८३
पानशेतछ १०.६५ १००
वरसगाव : १२.८२ १००
टेमघर २.८३ ७६.३७
खडकवासला प्रकल्पातील एकूणसाठा २७.७४ ९५.१६
भामा आसखेड ७.६७ १००
पवना ८.५१ १००
उजनी ११.७४ २९.९१