• Mon. Nov 25th, 2024

    नेलकटरने हत्या करणाऱ्यास सदोष मनुष्यवधाची शिक्षा; हिणवल्याच्या रागातून मित्रालाच संपवल्याचे प्रकरण

    नेलकटरने हत्या करणाऱ्यास सदोष मनुष्यवधाची शिक्षा; हिणवल्याच्या रागातून मित्रालाच संपवल्याचे प्रकरण

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर : ‘छक्क्यासारखा दिसतोस’, असे म्हटल्याने मित्राचा खून केल्याच्या आरोपातून मुक्तता करून सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राहुल भोसले यांनी आरोपीला सदोष मनुष्यवधात तीन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली.

    काय आहे प्रकरण?

    रोशन सुखदेव डोंगरे (वय ३७, रा. धम्मगर्जना चौक) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर त्याचा मित्र नरेश नत्थूजी वरेकर (वय ४८, रा. दर्शन कॉलनी) याच्या हत्येचा आरोप होता. ही घटना नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जुनी मंगळवारी परिसरात ८ जून २०१६ रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली होती. दोघेही एकमेकांना ओळखत होते. घटनेच्या दिवशी रोशनने मिशी कापली होती. यावरून नरेशने त्याला ‘तू मिशी का कापली, तू छक्का झाला का?’ असे म्हणत चिडविले. यावरून रागाच्या भरात रोशनने नरेशच्या गळ्यावर नेलकटरने वार केले. यात नरेशचा मृत्यू झाला. पोलिसांनी त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला. मात्र, रोशनचा नरेशला ठार मारण्याचा उद्देश असल्याचे सिद्ध होत नसल्याचा युक्तिवाद रोशनचे वकील लुबेश मेश्राम, हिमांशू काळे आणि मयूर गंगवाल यांनी केला. हा युक्तिवाद मान्य करीत न्यायालयाने रोशनला खुनाच्या आरोपातून मुक्त करीत सदोष मनुष्यवधाच्या आरोपात तीन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. आरोपीची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे.
    व्हायरल चित्रफित बघताच पतीची शोधाशोध; पत्नीच्या अंगाचा थरकाप, शेवटी नको तेच घडलं…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *