• Sat. Sep 21st, 2024

कुमार विश्वकोशाचे भाग आता मुलांना वेबसाइटवर वाचायला मिळणार, राजा दीक्षित यांची माहिती

कुमार विश्वकोशाचे भाग आता मुलांना वेबसाइटवर वाचायला मिळणार, राजा दीक्षित यांची माहिती

‘कुमार विश्वकोशा’ची मूळ संकल्पना काय आहे?

– महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने आतापर्यंत मोठ्यांसाठी २१ खंड प्रसिद्ध केले आहेत. त्यांच्या नोंदी वेबसाइटवरही प्रसिद्ध केल्या आहेत. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या काळात कुमार कोशाची संकल्पना मांडण्यात आली होती. त्यानंतर सर्व अध्यक्षांनी त्यासाठी काही ना काही योगदान दिले. या योजनेचा पहिला टप्पा माझ्या कार्यकाळात पूर्ण होत असल्याचे समाधान वाटते. कुमार विश्वकोशाची मूळ संकल्पना १२ खंडांची असून, तिचा पहिला अध्याय आम्ही पूर्ण केला आहे. ज्ञानाच्या लोकशाहीकरणाला हातभार लावण्याचा हा प्रयत्न आहे.

कुमार विश्वकोशाची सुरुवात जीवसृष्टी आणि पर्यावरण या विषयांनी केली आहे का?

– हो. गेल्या काही वर्षांत पर्यावरण आणि जीवसृष्टीचे महत्त्व वाढले असताना कुमारवयीन मुलांसाठी या विषयातील समग्र साहित्य उपलब्ध नाही. मात्र, काळाची गरज ओळखून त्यांनी या विषयात रस घेणेही गरजेचे झाले आहे. त्यामुळे पहिल्या खंडाच्या चार भागात ‘अ’पासून ‘ज्ञ’पर्यंत या पर्यावरण, जीवसृष्टीशी संबंधित अनेक लहान-मोठ्या संकल्पना मुलांना समजतील, अशा सहज, सोप्या भाषेत मांडल्या आहेत. खंडाचा पहिला भाग २०११मध्ये पहिला, २०१४मध्ये दुसरा आणि २०१९मध्ये तिसरा भाग प्रसिद्ध झाला. आता चौथा म्हणजेच शेवटचा भाग आम्ही प्रसिद्ध केला आहे. यात विविध संकल्पना स्पष्ट करणाऱ्या १,०२५ नोंदी आहेत. सध्या vishwakosh.marathi.gov.in या वेबसाइटवर हा कुमार विश्वकोश बघता येईल. लवकरच या चारही भागांचे छापील ग्रंथ प्रकाशित होणार आहेत.

जीवसृष्टी आणि पर्यावरण हे शास्त्रीय, तांत्रिक विषय असल्याने मुलांसाठी त्यांचे लेखन करताना काही अडचणी आल्या का?

– या विषयांतील बारकावे मुलांपर्यंत सोप्या पद्धतीने पोहोचविण्यासाठी आम्ही होमीभाभा विज्ञान शिक्षण केंद्रातील डॉ. हेमचंद्र चिंतामणी प्रधान यांनी सहकार्य केले. प्रधान यांच्या सहभागातून आम्ही या क्षेत्रातील तज्ज्ञांची समिती नेमली होती. नोंदींची यादी निश्चित केली. मुलांची आकलनशक्ती डोळ्यांसमोर ठेवून त्यांना रंजक वाटेल आणि ज्ञानवर्धनही होईल अशा पद्धतीने लेखन केले. नोंदीची मांडणी करताना त्यात जास्त आकृत्या, चित्रे वापरली आहेत. ‘कुमार विश्वकोशा’चे मुखपृष्ठही त्यांच्या आवडीनुसार व्हावे, या उद्देशाने आम्ही युवा चित्रकारांची स्पर्धा घेतली होती. त्यांनी पाठवलेल्या चित्रातील एका चित्राची आम्ही निवड केली.
लाडक्या बाप्पासाठी कलाकारांनी केली खास आरास, देखाव्यातून दिला सामाजिक संदेश
कुमार विश्वकोशाचा पुढचा टप्पा काय असेल?

– कुमार विश्वकोशाप्रमाणेच ‘बालकोश’ही गरजेचा आहे. माझ्या कार्यकाळात मी त्याचे नियोजन करणार आहे. ज्ञानसंपन्न समाजाचे स्वप्न साकार करण्यासाठी असे प्रकल्प फार महत्त्वाचे आहेत. अद्ययावत बहुविद्याशाखीय ज्ञान मुलांच्या हाती ठेवण्याची आणि त्यांना रुची वाटेल अशा पद्धतीने ठेवण्याची गरज आहे. ज्ञानाच्या लोकशाहीकरणाला हातभार लावण्याचा आम्ही केलेला हा एक प्रयत्न आहे. आदिवासी खेड्यापासून शहरी मुलांपर्यंत कुमार विश्वकोश पोहोचला पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed