• Mon. Nov 25th, 2024

    PMP Bus: वाहतूककोंडी फोडण्यासाठी ‘बदली’ प्रयोग; रद्द होणाऱ्या फेऱ्या कमी करण्याचा प्रयत्न

    PMP Bus: वाहतूककोंडी फोडण्यासाठी ‘बदली’ प्रयोग; रद्द होणाऱ्या फेऱ्या कमी करण्याचा प्रयत्न

    पुणे : शहराच्या जवळपास सर्वच भागांत होणारी कोंडी ‘पुणे महानगर परिवहन महामंडळा’च्या (पीएमपी) बससाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. सकाळी आठ ते दुपारी एक आणि सायंकाळी सहा ते रात्री नऊ या दरम्यान ‘पीएमपी’च्या सर्व मार्गांवरील बस नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावत आहेत. वाहतूक कोंडीमुळे बसला उशीर होत असल्याने ‘पीएमपी’ला अनेक फेऱ्या रद्द कराव्या लागत असून, त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी असणाऱ्या मार्गांवर प्रवाशांना बस बदलून सेवा देण्याचा प्रयोग राबविण्याचे ‘पीएमपी’ने ठरविले आहे.

    फेऱ्या रद्दची नामुष्की

    पुणे, पिंपरी-चिंचवड या दोन्ही महापालिका क्षेत्रांसह ‘पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा’च्या (पीएमआरडीए) हद्दीत ‘पीएमपी’तर्फे सेवा पुरविली जाते. शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीचा मोठा फटका ‘पीएमपी’ला बसत आहे. सकाळी लवकर आणि रात्री उशिराने धावणाऱ्याच बस निर्धारित वेळेत पोहोचत असल्याचे दिसून आले आहे. विशेषत: सकाळी ११च्या सुमारास आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेतील बस उशिरा धावत असल्याने पुढील फेऱ्यांवर परिणाम होत आहे. त्यामुळे ‘पीएमपी’ला काही फेऱ्या रद्द करण्याची वेळ आली आहे.

    बस अडकल्यास पर्यायी सोय?

    फेऱ्या रद्द होत असल्याने प्रवाशांची गैरसोय आणि उत्पन्नाला फटका, अशा दुहेरी कात्रीत ‘पीएमपी’ अडकली आहे. कोंडीत फसल्याने रद्द होणाऱ्या फेऱ्यांवरील उपाय म्हणून नवीन प्रयोग करण्याचा निर्णय घेतला आहे. वाहतूक कोंडीत बस अडकल्यास प्रवाशांना खाली उतरून दुसऱ्या बसने सेवा देता येईल का, याची प्रायोगिक स्वरूपातील चाचपणी केली जाणार आहे. गणेशोत्सवानंतर पाहणी करून त्यानुसार काही मार्गांवर अशी सेवा देण्याचा ‘पीएमपी’चा प्रयत्न आहे.

    प्रयोग नेमका कसा?

    – मध्यवर्ती भागातील रस्त्यांवर नेहमीच कोंडी असते. ऐन सणासुदीत कोंडीत आणखी भर पडते.
    – अशा वेळी निगडीवरून थेट कात्रजला जाणाऱ्या बसला नियोजित वेळेपेक्षा अर्धा ते एक तास उशीर होऊ शकतो.
    – उशिरा धावणाऱ्या बस पूर्ण मार्गावर संचलनात ठेवण्याऐवजी निगडीहून येणारी बस शिवाजीनगर अथवा शनिवारवाड्यापर्यंत धावणार.
    – शिवाजीनगर/शनिवारवाडा येथे प्रवाशांना उतरवून स्वारगेट अथवा कात्रजला जाणाऱ्या बसमध्ये प्रवाशांना जागा दिली जाणार.
    – निगडीतील प्रवाशांना स्वारगेट-कात्रजच्या दिशेने घेऊन पुढील बस घेऊन गेल्यानंतर ही बस पुन्हा नव्या प्रवाशांसह निगडीच्या दिशेने मार्गस्थ होणार.
    – या नव्या प्रयोगातून कोंडीमुळे बसला होणारा विलंब कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
    पिंपरी-चिंचवडमधील पोलिस अंमलदारांना बाप्पा पावला; तब्बल ३९४ जणांना पदोन्नतीचा ‘प्रसाद’
    वाहतूक कोंडीचा आर्थिक फटका

    – एखाद्या मार्गावर दिवसभरात १२ ते १४ फेऱ्यांचे नियोजन केलेले असले, तरी वाहतूक कोंडीमुळे तेवढ्या फेऱ्या पूर्ण होत नाहीत.
    – नियोजित फेऱ्यांऐवजी आठ ते दहाच फेऱ्या झाल्या, तर उर्वरित फेऱ्यांमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागते.
    – फेऱ्या रद्द होण्याबरोबरच वाहतूक कोंडीत बस बऱ्याच वेळ अडकून पडल्यास इंधनावर अतिरिक्त खर्च होतो. त्यामुळे तोट्यात वाढ.
    – लांब पल्ल्याच्या मार्गावर धावणाऱ्या बसला वाहतूक कोंडीचा सर्वाधिक फटका बसतो. अनेकदा या बसच्या नियोजित फेऱ्यांपैकी निम्म्याही फेऱ्या पूर्ण होत नाहीत.

    पीएमपीला वाहतूक कोंडीचा सर्वाधिक फटका सहन करावा लागत असल्याने लांब पल्ल्याच्या बसचे मार्ग मध्येच बंद केले जातील. वाहतूककोंडी होणाऱ्या ठिकाणांच्या पुढे दुसऱ्या बसने सेवा देण्याचा प्रयत्न असेल. प्रायोगिक स्वरूपात हा बदल राबविला जाणार असून, त्यानुसार पुढील नियोजन केले जाईल.- सचिंद्र प्रताप सिंह,अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक, ‘पीएमपी’

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed