या अपघाताबाबत अधिक माहिती अशी की, मृत ऋतुजा डुंबरे ही रस्त्याने घरी चालत जात होती, तर गीताराम नामदेव तांबे व पत्नी सविता तांबे हे दोघे पती-पत्नी आळेफाट्याच्या दिशेने मोटारसायकलवरून जात होते. त्यावेळी रस्त्याने भरधाव वेगात चाललेल्या पिकअप एम. एच. १४ के. ए ५१३७ हा कल्याणच्या दिशेने जात होता. मात्र ओतूर परिसरातील कोळमाथा येथे असणाऱ्या दत्तभेळ हॉटेलसमोर रस्त्याने चाललेल्या युवतीला आणि दुचाकीवर चाललेल्या पती पत्नीला पिकअपने धडक दिली. अपघातानंतर पिकअप वाहन रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन पलटी झाली. अपघातानंतर चालक हा गाडी सोडून घटनास्थळावरून पळून गेला आहे. या प्रकरणी अधिक तपास ओतूर पोलीस करत आहेत. महामार्गावर अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून योग्य उपाययोजना करण्याची मागणी प्रवासी नागरिकांकडून केली जात आहे.
पुणे जिल्ह्यात भीषण अपघात: तरुणीसह महिलेचा जागीच मृत्यू, एक जण गंभीर जखमी
जुन्नर, पुणे : जुन्नर तालुका हद्दीत नगर- कल्याण महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. ओतूर परिसरात असणाऱ्या कोळमाथा या ठिकाणी एका पायी चाललेल्या युवतीला आणि तिथून दुचाकीवर चाललेल्या पती-पत्नीला पिकअप वाहनाने एकाच वेळी धडक दिल्याने या अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसंच दुचाकीचालक गंभीर जखमी झाला आहे. जखमींना उपचारासाठी आळेफाटा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
ऋतुजा अशोक डुंबरे (वय १९) आणि सविता गीताराम तांबे (वय ४५) या दोघींचा या अपघातात मृत्यू झाला असून गीताराम नामदेव तांबे (वय ५२) हे जखमी झाले आहेत. अपघातातील मृत आणि जखमी यांची घरे महामार्गापासून हाकेच्या अंतरावर आहेत. त्यामुळे ओतूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.