• Mon. Nov 25th, 2024

    मराठा समाजातील लक्षित गटासाठी सारथी मार्फत उच्च कृषी तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षणाचे आयोजन

    ByMH LIVE NEWS

    Sep 20, 2023
    मराठा समाजातील लक्षित गटासाठी सारथी मार्फत उच्च कृषी तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षणाचे आयोजन

    छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, अर्थात सारथीच्या माध्यमातून राज्यातील मराठा समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक  प्रगतीसाठी विविध कल्याणकारी उपक्रम, योजना व्यापक स्वरुपात राबवण्यात येत आहेत.

    त्यानुसार (सारथी ) पुणे मार्फत राज्यातील लक्षित गटातील शेतकऱ्यांना सारथी संस्थेच्या खर्चाने राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था, तळेगाव दाभाडे, पुणे यांचेमार्फत हरितगृहातील व्यवस्थापन व अन्य 9 प्रकारची कृषी उच्च तंत्रज्ञानावर आधारित विनामुल्य प्रशिक्षणासाठी राज्यातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा प्रवर्गातील शेतकरी, युवक, युवतींकडून उच्च कृषी तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षणासाठी अर्ज मागविण्यात येत आहे.

    असे असेल प्रशिक्षण

    फलोत्पादन उत्पादन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षणा अंतर्गत हरितगृह व्यवस्थापन, शेड नेट हाऊस व्यवस्थापन, रोपाची अभिवृद्धी आणि भाजीपाला रोपवाटिका व्यवस्थापनाचे 5 दिवसाचे प्रशिक्षण 40 प्रशिक्षणार्थ्यांना देण्यात येईल.

    फलोत्पादन व्यवस्थापन प्रशिक्षणात लँडस्केप व्यवस्थापन, ऊती संवर्धन तंत्रज्ञान, ड्रायफ्लॉवर, प्लँट पार्टस् 5 दिवसाचे प्रशिक्षण 40 प्रशिक्षणार्थ्यांना देण्यात येईल. आणि पुष्प रचनाचे 3 दिवसाचे प्रशिक्षण 40  प्रशिक्षणार्थ्यांना देण्यात येईल.

    फलोत्पादन उत्पादन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण अंतर्गत पीक निहाय प्रशिक्षण कार्यक्रम त्यात फुल पिके, गुलाब, जरबेरा, कार्नेशन, प्रक्षेत्रावरील फुलांची, फिलरची लागवड तसेच पीक निहाय प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत भाजीपाला, शिमला मिरची, चेरी टोमॅटो, काकडीचे 5 दिवसाचे प्रशिक्षण 40 प्रशिक्षणार्थ्यांना देण्यात येईल. त्याचप्रमाणे काढणीपश्चात प्रशिक्षणातंर्गत फळ पिके व भाजीपाला यांचे काढणीपश्चात व्यवस्थापन व पुरवठा साखळी व्यवस्थापनाचे 3 दिवसाचे प्रशिक्षण 40 प्रशिक्षणार्थ्यांना देण्यात येईल.

    लाभार्थी निवड अटी शर्ती

    प्रशिक्षणासाठी लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. तसेच मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी या प्रवर्गातील असावा. उमेदवाराचे वय 18 ते 50 दरम्यान असावे. यासाठी लाभार्थ्यांचे मागील 3 वर्षांचे वार्षिक आर्थिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असावे. प्रशिक्षण हे मराठी माध्यमात देण्यात येईल. क्षमता बांधणी प्रशिक्षणे ही पूर्णकालीन निवासी असून प्रशिक्षणाचा संपूर्ण खर्च सारथी, पुणे यांच्यामार्फत करण्यात येईल. सदर क्षमता बांधणी प्रशिक्षण राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था मार्फत तळेगाव (दाभाडे) जि.पुणे येथे देण्यात येईल. प्राप्त अर्जामधून निकषांच्या आधारे अर्जाची छाननी करुन क्रमवार निवडक पात्र उमेदवारांची यादी सारथीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. प्रशिक्षणासाठी उपस्थित राहण्यासाठी येणारा प्रवास खर्च संबंधित प्रशिक्षणार्थीना स्वत करावा लागेल. उर्वरीत पात्र प्रशिक्षणार्थीचा विचार पुढील बॅचसाठी केला जाईल. याबाबतची सूचना सारथीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. प्रशिक्षण सुरु झाल्यानंतर उमेदवारास प्रशिक्षणास गैरहजर राहता येणार नाही.  प्रशिक्षण हे राष्ट्रीय सुगीपश्चात तंत्रज्ञान संस्था, सर्व्हे क्रमांक 398/400 सीआरपीएफ कॅम्प जवळ, जुना पुणे-मुंबई महामार्ग तळेगाव-दाभाडे, पुणे येथे राहील.

    तरी ईच्छुकांनी योजनेच्या अधिक माहितीसाठी व अर्जासाठी https://sarthi-maharashtragov.in/ या संकेतस्थळावर अथवा थेट एनआयपीएसटी च्या https://www.nipht.org   वरील लिंक https://sarthi.nipht.org   द्वारे 31 ऑक्टोबर, 2023 पर्यंत सादर करावे. ऑनलाईन अर्ज सादर केल्यावर कागदपत्रे हार्ड कॉपी 10 दिवसांच्या आत किंवा 10 नोव्हेंबर, 2023 पुर्वी राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था, पुणे यांचेकडे पाठविण्यात यावे.

    संकलनजिल्हा माहिती कार्यालय,नाशिक

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed