या झटापटीत शिवसैनिक महेंद्र दिपटे यांची प्रकृती काहीशी खालावली होती. त्यांच्या चेहऱ्यावर जखमा व बीपी पूर्ण लो झाल्याची माहिती त्यांनी स्वत: दिली होती. याच पार्श्वभूमीवर १८ सप्टेंबर रोजी माजी राज्यमंत्री व शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांनी महिंद्र दिवटे यांच्या घरी जाऊन त्यांची विचारपूस करत सांत्वनपर भेट घेतली. बच्चू कडू हे जुने शिवसैनिक आहेत. नव्वदच्या काळात शिवसेना उभारीला येत असताना महेंद्र दिपटे व आमदार बच्चू कडू हे अनेक आंदोलनात सोबत असायचे. त्यामुळे बच्चू कडू यांनी महिंद्र दिवटे यांची विचारपूस करण्यासाठी त्यांच्या घरी भेट दिल्याची माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षानंतर आमदार रवी राणा व आमदार बच्चू कडू यांच्यामध्ये खोके घेतल्याच्या कारणावरून चांगलाच वाद रंगला होता. हा वाद मिटवण्यासाठी हाय कमांडने मध्यस्थी केल्यानंतर बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांनी नमती भूमिका घेत विषयाला विराम दिला होता. त्यानंतर आमदार राणा व महेंद्र दिपटे यांच्यात झालेल्या वादानंतर बच्चू कडू यांनी महिंद्र दिवटे यांच्या घरी जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. या घटनेने जिल्ह्याच्या राजकीय गोटात एक वेगळा संदेश गेला असून विस्मरणात गेलेला रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातला वाद यानिमित्ताने पुन्हा ताजा झाला आहे.