मिळालेल्या माहितीनुसार, सोंटूने डायमंड एक्स्चेंज डॉट कॉम ही लिंक पाठवून व्यापाऱ्याला गंडा घातला. ज्या क्रमांकावरून ही लिंक पाठविण्यात आली, तो क्रमांक आपला नसल्याचा दावा सोंटूने पोलिसांसमोर केला. पोलिसांनी अधिक माहिती काढली असता गुन्हा दाखल झाल्यानंतर याच क्रमांकावरून त्याने तीनवेळा वकील मित्रासोबत व्हॉट्सअॅप चॅटिंग केले. त्यानंतर वकिलाने तक्रार परत घेण्यासाठी अग्रवाल यांच्यावर दबाव आणला. एकदा प्रत्यक्ष भेटूनही त्याने ‘तक्रार मागे न घेतल्यास वाईट परिणाम होतील’, अशी धमकी अग्रवाल यांना दिली होती. मोबाइलबाबत विचारणा केली असता, दुबई विमानतळावर मोबाइल हरविल्याची माहिती सोंटूने पोलिसांना दिली.
लॅपटॉप दुबईतील एका हॉटेलच्या स्नानगृहात विसरल्याचेही तो पोलिसांना सांगत आहे. प्रकरणाशी संबंधित दोन महत्त्वाचे पुरावे अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. सोंटूच्या चौकशीदरम्यान नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोचा (एनसीबी) एक अधिकारी नागपुरात दाखल झाला. तो वर्धा मार्गावरील हॉटेल रॅडिसन ब्लूमध्ये थांबला. याचकाळात या अधिकाऱ्याने चौकशीच्या प्रक्रियेत सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांसह सुमारे १० जणांशी संपर्क साधला. ही माहिती समोर आल्याने पोलिसांमध्येही खळबळ उडाली. त्यामुळे आता हा अधिकारीही पोलिसांच्या रडारवर आला आहे. तो हरियाणातील असून, सीमा सुरक्षा दलातून निवृत्त झालेला असल्याचे कळते.