म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : मध्य रेल्वेने बेलापूर ते पनवेल स्थानकाच्या दरम्यान २ ऑक्टोबरपर्यंत रात्रीच्या वेळी कामासाठी मेगाब्लॉक घेतला आहे. या कालावधीत प्रवाशांची गैरसोय होऊ नये, म्हणून नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाने बेलापूर रेल्वे स्थानक ते पनवेल रेल्वे स्थानक या दरम्यान आपल्या बसच्या ३२ विशेष फेऱ्या सुरू केल्या आहेत. या बसफेऱ्यांमुळे रात्री उशिरा कामावरून परतणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळत आहे.
मध्य रेल्वेने पनवेल स्थानकावर समर्पित मालवाहतूक कॉरिडॉरसाठी दोन ट्रॅक (अप आणि डाऊन) बांधण्याच्या कामासाठी बेलापूर ते पनवेल स्थानकाच्या दरम्यान रात्रीचा ब्लॉक घेतला आहे. रात्री १२.३० ते पहाटे ५.३० या पाच तासांसाठी हा ब्लॉक घेतला जात आहे. या कालावधीत बेलापूर ते पनवेलपर्यंतच्या रात्रीच्या फेऱ्या रद्द केल्या आहेत. यामुळे उशिरा कामावरून परतणाऱ्या आणि सकाळी पहाटे लवकर निघणाऱ्या प्रवाशांपुढे मोठा पेच निर्माण झाला होता, अशी माहिती एनएमएमटीचे मुख्य वाहतूक अधिकारी उमाकांत जंगले यांनी दिली.
त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी एनएमएमटीकडून रात्री १२ ते २ आणि पहाटे ४ ते ६ या कालावधीत आठ बस चालवल्या जात आहेत. या बसच्या दररोज ३२ फेऱ्या होत आहेत. यामध्ये पहिली बस पनवेलहून मध्यरात्री १२ वाजता असून शेवटची बस सकाळी ६.३४ वाजता उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळत आहे. प्रवाशांचा या सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.