• Sat. Sep 21st, 2024

पुणेकरांसाठी खूशखबर: महत्त्वाच्या मार्गावरील वाहतूक कोंडी फुटणार, ४ हजार कोंटीचा हायवे उभारणार

पुणेकरांसाठी खूशखबर: महत्त्वाच्या मार्गावरील वाहतूक कोंडी फुटणार, ४ हजार कोंटीचा हायवे उभारणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे : मुंबई ते बंगळुरू बाह्यवळण महामार्गावरील नऱ्हे ते रावेत या भागातील वाहतूक कोंडीवर आता कायमस्वरूपी तोडगा निघणार आहे. या मार्गावरील नऱ्हे भागातील स्वामी नारायण मंदिर ते रावेत या भागात एलिव्हेटेड महामार्ग बांधण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) चार हजार कोटी रुपयांचा ‘डीपीआर’ तयार केला असून, तो मान्यतेसाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे.

विविध प्रश्नांसंदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ‘एनएचएआय’सोबत बैठक घेतली. त्या वेळी ‘एनएचएआय’चे प्रकल्प संचालक संजय कदम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक बप्पा बहीर आदी उपस्थित होते.

Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचा जोर वाढणार, मुंबई, ठाण्यासह २३ जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी…

मुंबई ते बंगळुरू महामार्गावर नऱ्हे भागात सातत्याने वाहतूक कोंडी होते. त्याशिवाय या भागात अपघाताच्या घटना घडतात. या पार्श्वभूमीवर सुळे यांनी ‘एनएचएआय’च्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता अधिकाऱ्यांनी त्यांना त्या ठिकाणच्या एलिव्हेटेड महामार्गाची माहिती दिली. मुंबई ते बंगळुरू महामार्गावर स्वामीनारायण मंदिर ते नवले पूल, वारजे आणि चांदणी चौकापर्यंतच्या पाच किलोमीटरच्या पट्ट्यात आणि पुढे रावेतपर्यंत सतत वाहतूक कोंडी होते. त्यावर तोडगा काढण्यासाठी ‘एनएचएआय’ने चार हजार कोटी रुपयांचा ‘एलिव्हेटेड’ महामार्ग बांधण्यासाठी ‘डीपीआर’ तयार केला आहे. तो मान्यतेसाठी केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. त्याला अद्याप मान्यता मिळाली नाही. मान्यता मिळाल्यानंतर एका वर्षामध्ये निविदा प्रक्रिया सुरू होईल, असे बैठकीत सांगण्यात आले.

वडगाव, मुठा नदीपर्यंत सेवा रस्ता

वडगाव येथील पुलासह वारजे येथील मुठा नदीवरील पूल आणि दोन्ही बाजूला १२ मीटर सेवा रस्त्याचे काम करण्यासाठी ३६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याशिवाय कोथरूड ते मुळशी भुयारी मार्गाचेही काम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. ही कामे लवकर पूर्ण झाल्यास या भागातील दळणवळण अधिक सुसह्य आणि सक्षम होणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी या वेळी सांगितले.

चांदणी चौकात दोन महिन्यांत ‘अंडरपास’

चांदणी चौकाजवळील वेदभवनच्या मालकीच्या ५३० चौरस मीटर जागेचा वाद सर्वोच्च न्यायालयात होता. तो आता निकाली निघाला आहे. त्यामुळे वेदभवनची जागा ‘एनएचएआय’च्या ताब्यात मिळाली आहे. येत्या दोन महिन्यांत त्या ठिकाणी अंडरपास तयार करण्यात येणार असून, त्यामुळे वाहतूक कोंडीसह गैरसोय दूर होईल, असा दावा ‘एनएचएआय’ने केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed