पंचवटी परिसरात राहणाऱ्या रवींद्र डोंगरे यांना ८ ते १६ ऑगस्ट या कालावधीत वेबसाइट आणि फोनद्वारे संशयितांनी संपर्क साधला. त्यावेळी पार्टटाइम स्वरूपात व्यवसाय केल्यास त्यामाध्यमातून अधिकचा नफा मिळवून देण्याचेही आमिष दाखविले. त्यासाठी गुंतवणूक व भांडवल म्हणून टप्प्याटप्प्याने ३ लाख ५ हजार रुपये ऑनलाइन स्वरूपात घेतले. मात्र, त्यानंतर कोणत्याही प्रकारचा व्यवसाय सुरू झाला नाही. किंबहुना गुंतविलेले पैसेही परत न मिळाल्याने डोंगरे यांनी सायबर पोलिसांत धाव घेतली. त्यांच्या तक्रार अर्जावरून सायबर पोलिसांनी बँक खाते क्रमांक, यूपीआय आयडी आणि टेलिग्राम आयडीवरील संशयितांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख यांच्याकडे पुढील तपास देण्यात आला आहे.
कामाच्या नावे गंडा
शहरात दीड ते दोन महिन्यांपासून सातत्याने काम देण्यासह गुंतवणुकीच्या नावाने फसविण्याचे प्रकार वाढल्याच्या नोंदी पोलिसांत दाखल गुन्ह्यांवरून समोर येत आहेत. प्रत्येक गुन्ह्यात दीड ते चार लाख रुपये चोरट्यांनी लंपास केले आहेत. या प्रकरणी सायबर पोलिसांनी प्रबोधनाला सुरुवात केली आहे. मात्र, कोणत्याही नागरिकाने नफा मिळेल या अपेक्षेतून अज्ञात व फक्त फोनवरून संपर्क झालेल्या व्यक्तीला पैसे न देण्याच्या सूचना पोलिसांनी केल्या आहेत. कारण, राज्याबाहेरील काही ठिकाणांवरून याप्रकारचे सायबर गुन्हे करणारे ‘नेटवर्क’ तयार झाले आहे. त्या माध्यमातून महाराष्ट्रच नव्हे, तर देशभरात फसवणूक होत असल्याचे पोलीस तपासांत पुढे येत आहे. महाराष्ट्र सायबर सेल आणि देशातून त्यावर नियंत्रण मिळविण्यात येत असले, तरी नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन नाशिक सायबर पोलिसांनी केले आहे.