म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे आजी-आजोबांच्या गोष्टी विस्मृतीत जाण्याची स्थिती निर्माण होऊ लागली आहे. संस्काराची शिदोरी असलेल्या आजी-आजोबांना त्यांच्या नातवंडासह शाळेतील वर्गात बसविण्याचा उपक्रम नुकताच शाळांनी केला. नातवांशी संवाद साधत आजी-आजोबांनी गोष्टींमधून अनुभवाचे बोल सुनावले. शिक्षकांनाही यातून बोध घेता आला. कोणी नातवांना चॉकलेट, बिस्किटे, तर कोणी भेट स्वरुपात पुस्तक आणली.
शाळांमध्ये शनिवारी आजी आजोबा दिवस साजरा करण्यात आला. सकाळी शाळा भरली अन् विद्यार्थी शाळेत आले ते आजी-आजोबांसोबतच. प्रार्थना झाल्यानंतर सुरू झालेल्या समारंभात काही वेळातच मुलांसोबत गप्पांमध्ये रममाण झालेल्या आजी-आजोबांनी जुन्या काळातील ओव्या, भजने, सादर केली. काही आजोबांनी गोष्टी सांगितल्या. काही ठिकाणी सुरुवातीला विद्यार्थ्यांनी आपल्या आजी-आजोबांचे औक्षण केले. फुलं, पुष्पगुच्छ देत आपल्या शाळेत स्वागत केले. आजी-आजोबांनी स्वागत झाल्यानंतर विद्यार्थ्यांशी संवाद, आपले अनुभव कथन केले. आजी-आजोबांकडून कुठे नातवाला चॉकलेट मिळालं, तर कुठे उजळणी, शब्दार्थाची पुस्तके…! त्यानंतर मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसांडून वाहत होता.
सरकारची कंत्राटी नोकर भरती तरुणांचे शोषण करणारी, निर्णय लगेच मागे घ्या अन्यथा… काँग्रेसचा एल्गार
अनेक शाळांमध्ये आजी-आजोबांसमोर विद्यार्थ्यांनी बडबड गीते, गोष्टी सांगत अभ्यास, वाचनाची चुणूकही दाखवून दिली. काही ठिकाणी आजोबांनी विद्यार्थ्यांना गोष्टी सांगितल्या, त्याचबरोबर त्यांच्या काळातील शाळा शिक्षक व शिक्षण घेण्याची पद्धत कशी होती, त्यांनी बिकट परिस्थितीमध्ये कशा प्रकारे शिक्षण घेतले, त्यांना शिक्षणाची आवड कशी लागली हे सांगताना शिक्षणाचे महत्त्वही त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिलं. काही शाळांमध्ये आजोबांनी ओव्या, भजने सादर केली. नातवांसह आजी-आजोबांची भरलेली शाळा अनोखी ठरली. ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेसह शहरी भागातील शाळांमध्येही उपक्रम राबविण्यात आला. शाळांमध्ये उपक्रमाचा उत्साह दिवसभर दिसून आला.
कोकणात जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी, अवघड वळणांचा ४० मिनिटांचा प्रवास १० मिनिटांवर!
आजी-आजोबा भारावले
शाळांमध्ये नातवासह आजी-आजोबांनी हजेरी लावत तेवढ्याच उत्साहात सहभाग घेतला. आजी आजोबांचा मुलांनी सत्कार, सन्मान केला. अनेक शाळांमध्ये मुलांनी गीते, कविता, आपल्यातील विविध कलागुणांचे सादरीकरण केले. आपल्या नातवांचे कर्तृत्व बघून आजी आजोबाही भारावून गेल्याचे चित्र होते. आजी-आजोबांना त्यांच्या नातवंडासह शाळेतील वर्गात बसविण्याचा उपक्रम नुकताच शाळांनी केला.