जागावाटपाची चर्चा लवकर पूर्ण व्हावी अशी अपेक्षा आहे. त्यासाठी काँग्रेस नेत्यांसोबतही चर्चा करावी लागेल. शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आदी नेते या चर्चेसाठी लवकरच एकत्र जमतील, असे पाटील म्हणाले. काँग्रेस नेते सध्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे या चर्चेदरम्यान दूरध्वनीवरून नाना पटोले यांच्याशीही संपर्क साधण्यात आला असे सांगण्यात आले. सध्या सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या प्रश्नावर उभय नेत्यांमध्ये चर्चा झाली. जालना परिसरात मनोज जरांगे पाटील हे १५ दिवस मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर बेमुदत उपोषणास बसले आहेत. त्या आंदोलनाबाबत मार्ग काढण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. बिनकामाचे नेते जाऊन त्यांच्याशी चर्चा करतात. कानात जाऊन कुजबूज करतात त्यांना जरांगे पाटील यांनी फटकारले आहे. जरांगे पाटील यांच्याशी सरकारने अधिकृत चर्चा करायला व्हावी. एजंटामार्फत नाही, असे राऊत म्हणाले.
त्या आश्वासनांचे काय झाले…
आंदोलनाचे नेते जरांगे पाटील हे भूमिका सोडतील असे वाटत नाही. तो फाटका माणूस असून, त्यांना राजकारणातून काही मिळवायचे नाही. आरक्षण ही किचकट प्रक्रिया आहे. कायदेशीर तांत्रिक अशी प्रक्रिया त्यातूनच जावे लागेल. उपोषण सोडविण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी हजर राहावे असे जर जरांगे पाटील यांना वाटत असेल तर ती त्यांची भूमिका आहे. त्यात काही चुकीचे नाही. पहिल्या मंत्रीमंडळ बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. आमच्या हातात सत्ता द्यावी. २४ तासांत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावतो, असे फडणवीस म्हणाले होते असा दावाही राऊत यांनी केला.