मिळालेल्या माहितीनुसार, संदिप हरी मेधणे (४१, रा. खेडले, ता. दिंडोरी) यांच्याबरोबर किरण शरद कदम (रा. कोर्हाटे) आणि त्याचा संशयित मित्र अशा दोघांनी किरकोळ कारणावरुन मेधणे यांच्या घरात येऊन वाद घातला. मेधने यांना घराबाहेर घेऊन गेले. त्यानंतर ११ सप्टेंबर रोजी रात्री ८ ते ११ वाजेच्या सुमारास मेधणे यांच्या घराजवळील भागात चिंचेच्या झाडाखाली मेधणे यांना संशयित आरोपी किरण कदम आणि त्याचा अज्ञात मित्र या दोघांनी संगनमत करुन तीक्ष्ण हत्याराने मेधणे यांच्यावर वार केला. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने शरीरावर ज्वालाग्रही पदार्थ टाकून जाळण्याचा प्रयत्न केला, अशी तक्रार
मयताची आई रंभाबाई हरी मेधणे यांनी वणी पोलिसात दिली आहे.
अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे ,उपविभागीय अधिकारी संजय बामळे, सपोनी निलेश बोडखे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तक्रारीनुसार नमुद दोन संशयित आरोपी यांच्या विरोधात खुनाचा आणि पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी नाशिक येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आला. या प्रकरणी वणी पोलीस संशयितांचा शोध घेत आहेत. मात्र या घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.