• Sat. Sep 21st, 2024

पगार सत्तर हजार, पण पाच हजारांसाठी रेल्वे अधिकाऱ्याने लाज घालवली; लाच घेताना अडकला CBIच्या जाळ्यात

पगार सत्तर हजार, पण पाच हजारांसाठी रेल्वे अधिकाऱ्याने लाज घालवली; लाच घेताना अडकला CBIच्या जाळ्यात

नांदेड: वाहनाचे थकीत बिल काढून देण्यासाठी पाच हजाराची लाच घेताना सीबीआयच्या लाच लूचपत विभागाने नांदेडच्या एका रेल्वे अधिकाऱ्याला अटक केली आहे. एम शिवय्या असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. सोमवारी सायंकाळी सीबीआयच्या पथकाने ही कारवाई केली.

या प्रकरणातील तक्रारदाराने टेंडर द्वारे नांदेड, छत्रपती संभाजी नगर आणि पूर्णा रेल्वे विभागात तीन पिकअप वाहन उपलब्ध केले होते. महिन्याकाठी प्रत्येकी वाहनाला ४७ हजार ९९९ रुपये वाहन भाडे रेल्वे विभागाकडून दिले जाणार होते. मात्र मागील दोन वर्षापासून तक्रारदाराला पैसे काही देण्यात आले नाही. थकीत बिल भेटण्यासाठी तक्रारदाराकडून सतत पाठपुरावा सुरु होता. जवळपास ३४ लाख ५५ हजार ९२८ रुपये एवढे बिल थकीत होते. रेल्वेच्या इलेक्ट्रिकल विभागातील वरिष्ठ अभियंता एम शिवय्या यांच्याकडे मागणी केली होती. तेव्हा एम शिवय्या यांनी तक्रारदारास दहा हजार रुपयाच्या लाच मागितली. सुरुवातीला तक्रारदाराने पाच हजार हजार रुपये दिले होते. मात्र उर्वरित रकमेसाठी अधिकाऱ्याकडून तगादा लावला जात होता.

तेव्हा तक्रारदाराने ७ सप्टेबर रोजी पुणे येथील सीबीआयच्या लाच लुचपत विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार सोमवारी सायंकाळी सीबीआयचे चार अधिकारी नांदेडला पोहचले. त्यानंतर अधिकाऱ्याच्या दालनातच सापळा रचला. कार्यालयात तक्रारदाराकडून लाचेची उर्वरित रक्कम घेताना सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी रेल्वेच्याअधिकाऱ्याला अटक केली.

दरम्यान पूर्णा रेल्वेच्या अधिकाऱ्यावर देखील या पथकाने कारवाई केल्याची माहिती आहे. मंगळवारी रेल्वे अधिकाऱ्याला नांदेडच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायलयाने अधिकाऱ्याला १४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सीबीआय पथकाच्या या कारवाईने रेल्वे विभागात एकच खळबळ उडाली आहे. सीबीआयची नांदेडमध्ये ही पहिली कारवाई असल्याचे बोलले जात आहे. ७० हजार रुपये पगार असताना केवळ पाच हजार रुपयच्या लाचेसाठी अधिकाऱ्याने लाच घातल्याने रेल्वे विभागात चर्चेचा विषय बनला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed