मिळालेल्या माहितीनुसार, कामोठे शहरातील एका १७ वर्षीय तरुणीचा डेंग्यू आजारावर उपचार घेत होती. तिचा नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली असून संपूर्ण परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. विद्यार्थिनी ही नीट परिक्षेचा अभ्यास करत होती. पाच दिवसांपूर्वी तिला डेंग्यूची लक्षणे जाणवल्याने तिच्यावर उपचार सूरु होते. लाखो रुपयांचे वैद्यकीय देयक तिच्या पालकांकडून घेण्यात आले. तिचे शव देण्यासाठी सुद्धा संबंधित रुग्णालयाने वेळ लावला. वैद्यकीय सेवा देणाऱ्या रुग्णालयांनी देयक वसूलीसाठी घेतलेला पवित्रा हा सून्न करणारा आहे. या घटनेनंतर आम्ही पालिका आयुक्त आणि पालिकेचे मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन पालिकेने सरसकट कामोठे आणि पनवेल परिसरातील वाढती डेंग्यू रुग्णसंख्या लक्षात घेऊन पालिका क्षेत्रात सर्वच ठिकाणी डेंग्यू डास उत्पत्ती केंद्र शोध मोहीम, जनजागृतीपर कार्यक्रम हाती घ्यावे, असे धोरण तातडीने निश्चित करावे, अशी मागणी केली आहे. असे कामोठे कॉलनी फोरमच्या डॉ. सखाराम गारळे यांनी म्हटले आहे.
कामोठेत डेंग्युचा पहिला बळी गेला असून अनेक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. जेथे डेंग्यू सदृष्य आजाराचे रुग्ण सापडतात त्याच गृहनिर्माण संस्थांच्या परिसरात धूर फवारणी केली जाते, असे पालिकेचे धोरण असल्याची तक्रार करत कामोठे कॉलनी फोरमच्या सदस्यांनी सोमवारी पालिकेच्या आरोग्य विभागाची भेट घेऊन वसाहतीमध्ये सरसकट धूर फवारणी करण्याची मागणी केली. तसेच तातडीने धूर फवारणी करून डेंग्यूचे डास निर्माण होणाऱ्या केंद्रांची शोध मोहीम पालिकेने हाती घेण्यासाठी निवेदन दिले आहे.
जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यात २४१ रुग्ण डेंग्यू आजाराचे पालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे नोंदवले गेले आहेत. जुलै महिन्यात ११५ तर ऑगस्ट महिन्यात १२६ रुग्ण आढळल्याची माहिती पालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आनंद गोसावी यांनी दिली. कामोठे सेक्टर २१ मधील गुरुदेव हाईट्स या इमारतीचे प्रतिनिधी सोमवारी पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांची भेट घेण्यासाठी आले होते. मृत विद्यार्थिनीवर मागील आठवड्यापासून उपचार सुरु होते. मात्र दोन दिवसांपासून प्रकृती अत्यवस्थ झाल्याने तिला बेलापूर येथील अपोलो रुग्णालयात दाखल केल्याचे कामोठे कॉलनी फोरमचे डॉक्टर सखाराम गारळे यांनी सांगितले.
कामोठे वसाहतीमध्ये प्रत्येक गृहनिर्माण सोसायटीत २ रुग्ण डेंग्यूचे असल्याने वाढत्या रुग्णसंख्येमुळे सक्रिय कृती योजना पालिकेने हाती घ्यावी. पालिकेने डेंग्यू रोखण्यासाठी प्रत्येक सोसायटीत जनजागृती मोहिमेत डेंग्यूचे लक्षणे आणि खबरदारी याविषयी पालिकेने माहिती पत्रक प्रसिद्ध करावी, अशी नागरिकांची मागणी असल्याचे कॉलनी फोरमच्या सदस्यांनी सांगितले. तसेच गेल्या दोन आठवड्यात कामोठे वसाहतीमधील सेक्टर ६, ६ अ आणि ७ यामध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढल्यानंतर फोरमच्या सदस्यांनी पालिकेच्या कामोठे कार्यालयाकडे धूर फवारणीची माहिती विचारल्यावर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी धूर फवारणी फक्त डेंग्यू रुग्ण आढळणाऱ्या सोसायट्यांमध्ये आणि फक्त तळमजल्यावर केली जात असल्याचे सांगितले. यामुळे कामोठे कॉलनी फोरमच्या सदस्यांनी पालिकेच्या आरोग्य विभागाकडे संपर्क साधला.
पनवेल पालिका क्षेत्रात प्रत्येक रुग्णालय आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञांना साथरोगाचे रुग्ण आढळल्यास २४ तासांत पालिकेच्या पोर्टलवर त्याची माहिती देण्याविषयी सूचना केल्या आहेत. ज्या प्रयोगशाळा माहिती देत नाहीत त्यांच्यावर लवकरच कार्यवाही केली जाईल. मागील दोन महिन्यांपासून डेंग्यू आणि मलेरियाचे रुग्ण वाढले असून पालिका रुग्ण आढळल्यास त्या इमारतीच्या मजल्यावरील आणि सोसायटीतील डास प्रतिबंधक कार्यक्रमाप्रमाणे कार्यवाही करते. संबंधित रुग्णांच्या कामोठे येथील सोसायटीत २६ ऑगस्ट आणि २ सप्टेंबर अशा दोनवेळा धूर फवारणी केली होती. डेंग्यू आजाराने मृत्यू झालेल्याची माहिती मिळाल्यानंतर संबंधित रुग्णाच्या घरी दोन ठिकाणी झाडे ठेवण्याची कुंडीत डासांची पैदास झाल्याचे आढळले आहे.
नागरिकांकडून सरसकट वसाहतीमध्ये धूर फवारणी करण्याची मागणी होत आहे. याविषयी लवकरच वरिष्ठ निर्णय घेतील’, असे पनवेल पालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी म्हटले आहे. नवी मुंबईसह पनवेल शहरामध्ये देखील मच्छरांचे प्रमाण वाढत आहे. नवी मुंबई महानगरपालिका आणि पनवेल महानगरपालिकेने खबरदारी बाळगून प्रत्येक विभागांमध्ये धूर फवारणी केली पाहिजे. कामोठे विभागामध्ये डेंग्यूचा एक रुग्ण आढळल्याने पनवेल शहरासह नवी मुंबईमध्ये देखील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. पालिकेच्या वतीने वेळोवेळी आवाहन करण्यात येते. मात्र दूर फवारणी ही नियमित केली तर मच्छरांचे प्रमाण हे कमी होईल असे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका आणि पनवेल महानगरपालिकेच्या वतीने प्रत्येक विभागांमध्ये धूर फवारणी करणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.