म. टा. प्रतिनिधी, नागपूर : ‘जोपर्यंत स्वत:ला जाणत नाही, तोवर स्वत:चे मूल्यांकन करता येणार नाही, हे खरे आहे. मात्र न्यायाधीशांवर स्वत:चा चेहरा आरशात बघण्याची वेळ आली आहे काय’ असा सवाल सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांनी रविवारी ‘येस माय लॉर्ड, इट्स यू इन दी मिरर’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात उपस्थित केला. मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश रवींद्र चव्हाण लिखित या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा झाशी राणी चौकातील विदर्भ साहित्य संघाच्या अमेय दालनात झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून न्या. सिरपूरकर बोलत होते.
अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, तर मंचावर ‘येस माय लॉर्ड, इट्स यू इन दी मिरर’ या पुस्तकाचे लेखक व माजी न्यायाधीश रवींद्र चव्हाण, ज्येष्ठ अधिवक्ता कुमकुम सिरपूरकर यांची उपस्थिती होती. ‘सध्या न्यायाधीशांना कायद्याबाबत ज्ञान देण्याची गरज नाही; तर कायद्याचा विचार कसा करावा, हे शिकविण्याची गरज आहे. कायद्याच्या क्षेत्रात नव्याने येणाऱ्यांना न्यायाधीशांसारखा विचार करावा लागेल’, असे न्या. सिरपूरकर म्हणाले. ‘एकेकाळी न्यायाधीशांना फार कमी मानधन मिळायचे. मात्र आजच्या काळात भरपूर वेतन आहे’, याकडेही न्या. सिरपूरकर लक्ष वेधले.
या प्रकाशन सोहळ्याला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगांवकर यांनी दृकश्राव्य माध्यमातून संबोधित केले. ‘माणसाला आरसा दाखविणे ही अतिशय अवघड गोष्ट असते. न्यायाधीशांना त्यांचा यथोचित सन्मान देत व्यवस्थेतील दोष दाखविण्याचे कार्य पुस्तकाच्या माध्यमातून केले गेले आहे. व्यवस्थेतील दोष एकमेकांना सांगत ते दूर करण्याचे प्रयत्न करण्यात यावेत’, अशी अपेक्षा न्या. चपळगावकर यांनी व्यक्त केली.
अध्यक्षीय भाषणात प्रदीप दाते यांनी, ‘न्यायालयीन प्रक्रियेबाबत अधिकाधिक पुस्तके यावीत आणि यातून सामान्य माणसांना मार्ग दाखविण्यात यावा’, अशी अपेक्षा व्यक्त केली. सूत्रसंचालन अॅड. प्रज्ञा चितळे यांनी केले, तर अॅड. ऋषिकेश चव्हाण यांनी आभार मानले.
Maratha Reservation: ओबीसी प्रवर्गात वेगळ्या जातींचा समावेश नको, मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या: शरद पवार
न्यायाधीशांच्या मनातही वादळ
‘न्यायाधीश काही देव नसून ते देखील माणूसच आहेत. आसपासच्या परिस्थितीला बघून त्यांच्या मनातही वादळे उठत असतात. पुस्तक लिहिताना व्यवस्थेबाबत अधिक प्रकर्षाने लिहिल्यामुळे अनेकांनी यावर टीका केली’, अशा भावना लेखक माजी न्यायाधीश रवींद्र चव्हाण यांनी पुस्तकाबाबत मनोगत व्यक्त करताना व्यक्त केल्या.