• Thu. Nov 28th, 2024

    पायाखालचा भाग निखळला, स्फोटासारखा प्रचंड आवाज अन् लिफ्टचा सांगाडा कामगाराच्या अंगावर कोसळला

    पायाखालचा भाग निखळला, स्फोटासारखा प्रचंड आवाज अन् लिफ्टचा सांगाडा कामगाराच्या अंगावर कोसळला

    म. टा. प्रतिनिधी, ठाणे: बाळकुम परिसरातील रुणवाल आयरीन या ४० मजली इमारतीमधील सर्व्हिस लिफ्ट कोसळून पाच कामगारांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोन कामगारांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेले जात असताना एका कामगाराचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

    बाळकुम येथील नारायणी शाळेच्या बाजूला रुणवाल कॉम्प्लेक्समधील आयरीन या नुकतेच बांधकाम पूर्ण झालेल्या ४० मजली इमारतीच्या छतावर वॉटरप्रूफिंगचे काम सुरू होते. हे काम संपवून लिफ्ट ऑपरेटरसह सहा कामगार सर्व्हिस लिफ्टने खाली येत होते. यावेळी लिफ्टचा खालील भाग पूर्णपणे निखळला. त्यातून सर्व कामगार खाली कोसळून त्यांच्यावर लिफ्टचा लोखंडी सांगाडा कोसळला. घटनेची माहिती प्रत्यक्षदर्शींनी बाळकुम अग्निशमन दलाला कळवली. तातडीने बाळकुम अग्निशमन दलाचे स्टेशन अधिकारी ओमकार वैती घटनास्थळी पथकासह पोहोचले. तसेच या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव आणि ठाणे पालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक माजी नगरसेवक संजय भोईर यांनी दुर्घटनास्थळी धाव घेत बचावकार्यात मदत केली. बचाव पथकाने लिफ्टच्या सांगड्याखाली अडकलेल्या कामगारांना बाहेर काढले. गंभीर जखमी कामगाराची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. याप्रकरणी लिफ्ट यंत्रणा व कामगारांच्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा केला जाणार असल्याची माहिती पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिली.

    लिफ्ट आठव्या मजल्यावर पोहोचली, मोठा आवाज झाला अन् अनर्थ घडला; आजींचा करुण अंत, काय घडलं?

    या दुर्घटनेत महेंद्र चौपाल (३२), रुपेशकुमार दास (२१), हारून शेख (४७), मिथलेश (३५), कारिदास (३८) या कामगारांचा मृत्यू झाला असून एका मृत कामगाराची ओळख पटलेली नाही. तर, सुनीलकुमार दास (२१) हा कामगार जखमी झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली. ही दुर्घटनाग्रस्त लिफ्ट सागर एलिव्हेटर कंपनीची असून लिफ्टमध्ये नेमका कोणता तांत्रिक बिघाड झाला, याबाबत अधिक तपास सुरू आहे.

    स्फोटासारखा प्रचंड आवाज

    ही लिफ्ट खाली कोसळली तेव्हा आजुबाजूच्या परिसरात प्रचंड मोठा आवाज ऐकायला मिळाला. रुणवाल आयरीन इमारतीच्या बाजूलाच असणाऱ्या बिल्डिंगमधील एका व्यक्तीने याबाबत माहिती दिली. त्याने म्हटले की, हा अपघात ६ नंबरच्या इमारतीमध्ये घडला. मी त्यावेळी ७ नंबरच्या इमारतीमध्ये होतो. मला कमी तीव्रतेचा बॉम्ब फुटल्याप्रमाणे मोठा आवाज ऐकायला आला. थोडावेळ मला काय झाले हेच समजले नाही. मात्र, काहीवेळाने सर्व्हिस लिफ्ट कोसळून कामगारांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले, असे संबंधित व्यक्तीने सांगितले.

    Lift Collapses in Mumbai: कमला मिलमधील ट्रेड वर्ल्ड इमारतीमध्ये लिफ्ट कोसळली, अपघातात १५ जण जखमी

    दोन दिवसांपूर्वीच लिफ्टची दुरुस्ती, बोगस प्रमाणपत्र

    या सगळ्या घटनेनंतर ठाणे महानगरपालिकेतील माजी नगरसेवक संजय भोईर यांनी माहिती देताना सांगितले की, जी लिफ्ट खाली कोसळली ती दोन दिवसांपूर्वीच दुरुस्त करण्यात आली होती. त्यानंतर लिफ्ट व्यवस्थित असल्याचे खोटे प्रमाणपत्र देण्यात आले. या प्रकाराची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed