• Mon. Nov 25th, 2024

    मराठा आरक्षणाचे संपूर्ण राज्यात पडसाद; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज ठिकठिकाणी ‘रास्ता रोको’

    मराठा आरक्षणाचे संपूर्ण राज्यात पडसाद; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज ठिकठिकाणी ‘रास्ता रोको’

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवाली सराटी (जि. जालना) येथे उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांना राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये दररोज आंदोलने, रास्ता रोको, निदर्शने करण्यात येत आहेत. आज, सोमवारी (११ सप्टेंबर) जिल्ह्यातील इसारवाडी, शिऊर बंगला, कन्नडसह अनेक ठिकाणी बंद, रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

    छत्रपती संभाजीनगर-पुणे मार्गावरील इसारवाडी फाटा येथे आज सकाळी १० वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. छत्रपती संभाजीनगर-पुणे महामार्गावरील शिऊर बंगला येथे आज सकाळी १० वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. सोलापूर-धुळे महामार्गावरील अंधानेर फाटा (ता. कन्नड) येथे आज सकाळी ११ वाजता सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

    पिसादेवीतील आंदोलनाचा पाचवा दिवस

    मनोज जरांगे यांच्या उपोषणास पाठिंबा म्हणून पिसादेवी येथे मराठा मावळा संघटना व गावातील तरुणांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनातील तीन आंदोलक भरत कदम, पंढरीनाथ गोडसे, अमित जाधव यांनी ‘अन्नत्याग आंदोलन’ केले असून, आजचा पाचवा दिवस होता.

    रविवारी सकाळी अमित जाधव यांची प्रकृती बिघडली. डॉक्टरांनी सलाइन लावण्याचा सल्ला दिला; परंतु आंदोलक तयार नव्हते. या वेळी काही ज्येष्ठांनी सांगितल्यावर जाधव यांनी सलाइन लावण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, आंदोलकांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याबाबत संताप व्यक्त करून गावातील तरुण व ज्येष्ठ नागरिकांनी पिसादेवी येथे रस्ता रोको आंदोलन केले.
    मराठा आरक्षणाचे फुलंब्रीत पडसाद, तरुणाने थेट अंगावर ओतून घेतलं डिझेल अन्…
    दुपारी तहसीलदार चव्हाण यांनी आंदोलकांची भेट घेतली. याशिवाय माजी आमदार डॉ. कल्याण काळे, विनोद पाटील, अभिजित देशमुख, बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक संघटनांच्या प्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन पाठिंबा दिला. ‘सरकारने लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास आमच्या आंदोलनाचे स्वरूप अधिक तीव्र असेल. त्यास प्रशासन जबाबदार राहील,’ असा इशारा भरत कदम यांनी दिला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed