कोल्हापूर येथे होणाऱ्या उत्तरदायित्त्व सभेसाठी जात असताना हायवेवरील केदारवाडी फाटा येथे ॲड. वैभव पाटील यांनी अजित पवार यांच्या आयोजित केलेल्या सत्कार आणि स्वागत समारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ॲड. वैभव पाटील यांनी हजारो कार्यकर्त्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जंगी स्वागत केले.
राष्ट्रवादीत स्वतंत्र गट निर्माण करत अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच कोल्हापूर येथे होणाऱ्या उत्तरदायित्त्व सभेसाठी सांगली जिल्हामार्गे निघाले होते. अजितदादा पवार यांचे सांगली जिल्ह्यात जंगी स्वागत करण्यासाठी खानापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार ॲड. सदाशिवराव पाटील आणि त्यांचे पुत्र माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव पाटील हे जोरदार शक्तिप्रदर्शन करत विट्याहून रवाना झाले. वाळवा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर विटेकरांनी यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन केले.
केदारवाडी याठिकाणी अजित पवारांचा ताफा आल्यानंतर मोठ्या प्रमाणात जमलेल्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अजित पवारांचे फुलांची उधळण करत स्वागत करण्यात आले. यावेळी अजित पवार म्हणाले, उपमुख्यमंत्री म्हणून काम करत असताना मी सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करतो. फुले, शाहू, आंबेडकर यांचा विचार डोळ्यासमोर ठेऊन आपल्याला पुढील वाटचाल करायची आहे. आगामी काळात नवीन टीम आपल्याला तयार करायची आहे. ती नवीन टीम आपल्याला तयार करत असताना वैभव पाटील यांचं काम आम्हाला माहिती आहे. वैभव पाटलांना कधीही अंतर पडू देणार नाही, माझी सर्व ताकद त्यांच्या पाठीशी उभे करेन अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली.