नवापूर तालुक्यात गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पाऊस असल्यामुळे वागदे गावालगत नाल्याला पूर आला. येथील धावजी नाईक हे अल्पशा आजाराने मयत झाले. त्यांचा अंत्यसंस्कार १५ तास करता आला नाही शनिवारी पाण्याच्या जोर कमी झाल्याने ग्रामस्थांनी नाल्यातून चार फूट खोल पाण्यातून दोराच्या साहाय्याने मला जीव मोठे धरून स्मशानभूमी गाठली. नंदुरबार जिल्ह्यातील आजही अनेक गावांमध्ये रस्ते आणि पूल नसल्यामुळे आदिवासी बांधवांना मृत्यूनंतर देखील मरणयातना भोगाव्या लागत आहेत.
नवापूर तालुक्यातील वागदे येथील धावजी उघड्या नाईक यांचे शुक्रवारी दिनांक ८ तारखेला अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचा अंत्यविधी करण्यासाठी वागदे गावालागत नाला ओलांडून नाल्याच्या पलीकडे जावे लागणार होते. स्मशानभूमी ही नाल्याच्या पलीकडे असल्याने त्या ठिकाणी अंत्यसंस्कार केले जात असतात. गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांची पाणीपातळी वाढली आहे. वागदे गावाजवळ असलेल्या नाल्यात देखील पावसाच्या पाण्याने पूर परिस्थिती निर्माण झाली होती. १५ तासानंतर शनिवारी पाण्याचा जोर कमी झाल्याने धावजी नाईक यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला.
नवापूर तालुक्यातील धनराज कोतवाल फळीत अशाच पद्धतीने नदी ओलांडून अंत्यविधी करावा लागतो. त्याचप्रमाणे वागदे गावातही दिसून आले. अशा अनेक समस्या आजही प्रशासनाकडून सुटलेल्या नाहीत हे यावरून दिसून येते. नंदुरबार जिल्ह्यात १९८ ग्रामपंचायतींमध्ये स्मशानभूमी आहेत. तर ४४० ग्रामपंचायतींमध्ये स्मशानभूमी नसल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर नवापूर तालुक्यात ११६ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी २१ ग्रामपंचायतीत स्मशानभूमी असल्याची माहिती समोर आली आहे. ग्रामस्थांना धावजी नाईक यांची अंत्ययात्रा नेण्यासाठी नाल्यातून दोर लावून जावे लागले. यावर प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी नवापूर तालुक्यातून जोर धरू लागली आहे.