खूप दिवसांचे घाण्याचे तेल नकोच
खरे म्हणजे घाण्याचे तेल आणि रिफाइंड तेल दोन्हीही संपृक्त (सॅच्युरेटेड ऑइल) तेलांमध्येच मोडतात, ज्यामध्ये ओमेगा ३ (जे कोलेस्टेरॉल कमी करते) व ओमेगा ६ (हे रक्त पातळ ठेवते आणि रक्त गोठू देत नाही) हे दोन महत्वाचे घटक असतात. हे दोन्हीही चांगले गुणधर्म दोन्ही तेलांमध्ये आहेत. मात्र रिफाईंड तेलात याचे गुणधर्म कमी होतात. घाण्याच्या तेलात हे सगळे गुणधर्म असले तरीदेखील हे तेल प्रमाणात वापरणे हिताचे ठरते. तसेच, खूप दिवस ठेवलेले घाण्याचे तेल अजिबात वापरू नये, असेही कर्णिक म्हणाल्या.
एकदा वापरलेले पुन्हा वापरणे घातक
घाण्याच्या तेलात काही घटक नक्कीच चांगले असतात. मात्र घाण्याचे तेल वापरायचे म्हणून ते जास्त वापरले तरी चालते हा शुद्ध गैरसमज आहे. त्याचवेळी एकदा वापरलेले कोणतेही तेल दुसऱ्यांदा किंवा पुन्हा-पुन्हा वापरणे हे जास्त धोक्याचे आहे. मुळात प्रत्येक प्रौढ व्यक्तीने दिवसभरात २५ एमएलपेक्षाही कमी तेलाचे सेवन करणे खूप महत्त्वाचे आहे आणि ते कटाक्षाने पाळले पाहिजे, असे फिजिशियन डॉ. आनंद देशमुख म्हणाले.
अर्धा लिटरपेक्षा कमीच हवे सेवन
रिफाइंड असो की घाण्याचे, मुळात अत्यल्प तेलाचे सेवन करणे जास्त महत्त्वाचे आहे, याकडे लक्ष वेधताना हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मिलिंद खर्चे म्हणाले, व्यक्तीमागे महिनाकाठी अर्धालिटरपेक्षाही कमी तेलाचे सेवन हृदयाच्या आरोग्यासाठी गरजेचे आहे. पाश्चात्य देशांमध्ये ऑलिव्ह तेलाचा वापर होतो; परंतु ते कच्च्या स्वरुपात वापरले जाते आणि तेव्हाच त्याचे गुणधर्म सर्वाधिक प्रमाणात मिळतात. ऑलिव्ह तेलात अन्न शिजवले तर त्याचे गुणधर्म घटतात आणि ऑलिव्ह तेलाचासुद्धा दिवसभरात १५ एमएलपेक्षा जास्त वापर हा त्रासदायक ठरू शकतो, असेही डॉ. खर्चे म्हणाले.
‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’नुसार एका प्रौढ व्यक्तीमागे दिवसाकाठी केवळ १५ एमएल तेलाचे सेवन अपेक्षित आहे. याचाच अर्थ, दोन प्रौढ व्यक्तींमागे महिन्याकाठी केवळ एक लिटर तेलाची गरज आहे. हे लक्षात घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.-अलका कर्णिक, आहारतज्ज्ञ
‘आम्ही कमीच तेल वापरतो’, असे सर्वसाधारणपणे सगळ्यांचेच म्हणणे असते. मात्र कमी म्हणजे नेमके किती, याविषयी बहुतेकांमध्ये गोंधळ दिसून येतो. त्यामुळे १५ एमएलपेक्षा जास्त तेलाचे सेवन हे हृदयासाठी धोकादायक ठरू शकते, याची स्पष्ट जाणीव असणे महत्त्त्वाचे आहे.-डॉ. मिलिंद खर्चे, हृदयरोगतज्ज्ञ