शरद पवारांनी मुंबईत ९ सप्टेंबर रोजी एक महत्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला शरद पवारांना साथ देणारे सगळे विद्यमान आमदार ,खासदार राहणार उपस्थित राहणार आहेत. मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटर येथे ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यातील माजी आमदार, माजी खासदार, जिल्ह्या़चे शहराध्यक्ष, तालुकाध्यक्ष यांना निमंत्रण देण्यात आले आहेत. त्यामुळे आता बऱ्याच आमदार खासदारांनी अजित पवारांना साथ दिलेली असताना पक्षाचे माजी आमदार खासदार पदाधिकारी नक्की कोणाच्या सोबत आहेत हे या बैठकीतून स्पष्ट होणार आहे.
राज्यभरातील माजी आमदारांचा शरद पवार स्वतः आढावा घेणार आहेत. राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकसंध करण्यासाठी शरद पवारांनी ही महत्वाची बैठक बोलावली असून लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेऊन उमेदवारांची चाचपणी देखील या बैठकीतून करण्यात येणार असल्याची माहिती आहे. शरद पवार यांच्यासोबतच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि सुप्रिया सूळे हे देखील या बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत. सोबतच शरद पवार स्वतः राज्यातील विधानसभा , लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार असल्याने या बैठकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
दुसरीकडे १० सप्टेंबरला अजित पवार हे पुण्यात जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहेत. १० सप्टेंबरला अजित पवार कोल्हापूर दौऱ्यावर जाणार असून त्याआधीच पुण्यात जोरदार शक्तिप्रदर्शन करून भव्य रोड शो करणार आहेत. त्यानंतर शरद पवार यांच्या कोल्हापूर येथील सभेनंतर अजित पवार कोल्हापूर येथे जाणार असल्याने राज्यातील राजकारण येत्या आठवड्यात जोरदार तापणार असल्याच चित्र आहे.