• Sat. Sep 21st, 2024
गर्भवतीच्या प्रसूतीमध्ये गुंतागुंत; उपचार करण्यास तीन खासगी रुग्णालयांचा नकार, मात्र पालिका रुग्णालयात झाला चमत्कार

मुंबई: एका सत्तावीस वर्षीय गर्भवतीच्या प्रसूतीमध्ये गुंतागुंत निर्माण झाल्याने तीन खासगी रुग्णालयांनी उपचार नाकारले. मात्र महापालिकेच्या कूपर रुग्णालयातील तेरा जणांच्या वैद्यकीय चमूने तब्बल तीन तास शस्त्रक्रिया करून आई आणि बाळाचे प्राण वाचवले. गर्भआवरणाच्या समस्येमुळे या महिलेच्या आणि गर्भाच्या जीवाला देखील धोका निर्माण झाला होता. मात्र कूपर रुग्णालयाच्या वैद्यकीय चमूने प्रसूतीपूर्व देखरेख, गुंतागुंतीची शस्त्रक्रिया आणि प्रसूती पश्चात उपचार हे सर्व टप्पे यशस्वीपणे पार पाडून आई आणि बाळ दोघांचाही जीव वाचवला आहे.
शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला दुर्दैवी घटना! शाळेत जाण्यासाठी निघाल्या; मात्र वाटेतच अनर्थ, अन् लाडक्या मॅडम हरपल्या
गर्भ आवरण वेगाने वाढून गर्भाशयाला चिकटल्याने गर्भवती महिलांना प्रसूतिदरम्यान अतिरक्तस्रावाचा धोका निर्माण होतो. तसेच प्रसंगी गर्भ आणि नाळ खालच्या बाजूस सरकून शरीरात गुंतागुंत निर्माण होते. अशा प्रकारची धोकादायक स्थिती निर्माण झालेली एक सत्तावीस वर्षीय महिला तीन वेगवेगळ्या खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी गेली होती. मात्र त्या रुग्णालयांनी असमर्थता दर्शवल्यानंतर पालिकेच्या कूपर रुग्णालयामध्ये मे महिन्यात ती दाखल झाली. या महिलेची यापूर्वी दोन वेळा शस्त्रक्रियेद्वारे (सीझर) प्रसूती झाली असल्याने गर्भाशयाची नैसर्गिक रचना बिघडलेली होती. सुमारे आठवडाभर निरनिराळ्या प्रकारे वैद्यकीय परीक्षण केल्यानंतर या महिलेच्या जीवाला धोका असल्याचे स्पष्ट झाले होते.

गर्भधारणेनंतर २५ आठवड्यांचा कालावधी उलटल्याने गर्भपात करणेही अशक्य होते. या महिलेच्या गर्भधारणेला ३६ आठवडे उलटले असताना आत्यंतिक वेदना होवू लागल्याने कूपर रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांच्या निर्देशानुसार, स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र विभाग प्रमुख डॉ. रिना वाणी, डॉ. रश्मी जलवी, भूलतज्ज्ञ डॉ. नैना दळवी तसेच सहकाऱ्यांनी पूर्वनियोजन केले होते. तीन डॉक्टर, दोन भूलतज्ज्ञांसह दोन परिचारिकांसह अकरा जणांच्या पथकाने महिलेवर शस्त्रक्रिया करून बाळाचे प्राण वाचवले. गुंतागुंतीमुळे गर्भाशय देखील काढून टाकावे लागले. गर्भाशय न काढता शस्त्रक्रिया केली असती तर मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन बाळ किंवा महिला अथवा दोघांचा मृत्यू ओढवू शकला असता.

मावळात ७० वर्षीय महिलेच्या हाती ग्रामपंचायतीचा कारभार

या शस्त्रक्रियेदरम्यान सुमारे अडीच लीटर इतका रक्तस्राव झाला. एरवी अशाप्रकारच्या शस्त्रक्रियेदरम्यान २० ते ३० बाटल्या रक्तपुरवठा करावा लागू शकतो. मात्र डॉक्टरांच्या कौशल्यामुळे या महिलेला चौदा बाटल्या रक्त द्यावे लागले. प्रसूतिदरम्यान या महिलेने सुमारे २.६७० किलोग्रॅम वजनाच्या सुदृढ मुलीला जन्म दिला. आई आणि बाळाला अतिदक्षता उपचार कक्षांमध्ये ठेवण्यात आले. पुढील सतरा दिवस सामान्य कक्षामध्ये देखरेख करण्यात आली. वीस दिवसांच्या उपचारानंतर प्रकृती सुधारल्याने दोघांना घरी सोडण्यात आले. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी शस्त्रक्रिया करणाऱ्या वैद्यकीय चमूचे कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed