मात्र अजित पवार हे महायुतीत सामील झाल्याने राजकारण बदललेले दिसले. एकीकडे महाविकास आघाडी तर, दुसरीकडे महायुती असे चित्र राज्यात आहे. तर मनसेने एकला चलो रे ची भूमिका मांडली आहे. दरम्यान कल्याण डोंबिवलीमध्ये मात्र वेगळे चित्र दिसत आहेत. भाजपच्या बॅनरवर मनसे आमदारांचा फोटो हा अनेक वेळेला लावला गेला. यातच आता राष्ट्रवादीच्या बॅनरवर सुद्धा मनसे आमदारांचा फोटो झळकत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यातच आता याची चर्चा सुद्धा सुरु झाली आहे.
याबाबत मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, मनसे आमदार राजू पाटील हे निवडून आल्यापासून चांगल्या प्रकारे काम करत आहेत. सत्ताधारी आणि प्रशासनावर वचक ठेवण्याचे काम करत आहेत. शनिवारी संध्याकाळी कल्याण येथील आडीवली ढोकळी गावातील रस्त्याचे भूमिपूजन होते. या रस्त्याला मनसे आमदार पाटील यांनी निधी दिला आहे. त्यामुळे त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी माजी नगरसेवक कुणाल पाटील यांनी आपल्या बॅनरवर त्यांचा फोटो लावला आहे.
दरम्यान याबाबत मनसे आमदार यांनी सांगितले की, निवडून आल्यानंतर लोकप्रतिनिधी पक्ष न पाहता काम करतात आणि विकास कामांमध्ये आम्ही कधीही राजकारण केले नाही. आडीवली ढोकळी गावातील रस्त्याकरता माजी नगरसेवक कुणाल पाटील आणि शिवसेना (शिंदे गट) पदाधिकारी राहुल पाटील यांनी पाठपुरावा केला होता. आता त्याचे भूमिपूजन करण्यात आले आहे. तसेच लवकरच यांचे काम होईल, असे ते म्हणाले.