• Sat. Sep 21st, 2024
Pune News: पुण्यात लवकरच तीन नवे उड्डाणपूल; ‘या’ परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार

म. टा. विशेष प्रतिनिधी, पुणे: पुणे महापालिकेने दांडेकर पूल, संगमवाडीतील बिंदूमाधव ठाकरे चौक आणि येरवडा येथील शास्त्रीनगर चौकात उड्डाणपूल-ग्रेडसेपरेटर बांधण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या गर्दीच्या ठिकाणी उड्डाणपूल-ग्रेडसेपरेटर बांधणे शक्य आहे का? असल्यास नेमकी कशाची उभारणी करायची, यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागारांच्या नियुक्तीसाठी निविदा प्रकाशित करण्यात आल्या आहेत.

शहरातील वाहतूक कोंडी आणि अन्य महत्त्वाचे प्रश्न सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या बैठकीत मोठ्या प्रमाणात निधी देण्याची घोषणा करण्यात आली. या बैठकीत ठरल्यानुसार महापालिकेने अवघ्या दोनच दिवसांत २३७४ कोटी रुपयांचा आराखडा सरकारला सादर करण्यात आला होता. त्यापैकी कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी सरकारने २०० कोटी रुपये दिले आहेत. सरकारकडून अधिक निधी मिळण्याची शक्यता असल्याने महापालिका प्रशासनाने दांडेकर पूल, संगमवाडीतील बिंदूमाधव ठाकरे चौक आणि येरवड्यातील शास्त्रीनगर चौकात उड्डाणपूल-ग्रेड सेपरेटर बांधण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने काही वर्षांपूर्वी कृष्णराव ढोले चौकात (सेव्हन लव्हज चौक) उड्डाणपूल उभारल्यापासून दांडेकर पूल परिसरातही उड्डाणपूल बांधण्याची मागणी होत आहे. याठिकाणचा विकास आराखड्यातील रस्ता पूर्ण विकसित करणे शक्य नसल्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो आहे. पश्चिम पुण्यातून विमानतळाच्या दिशेने जाणारी वाहतुकीमुळे संगमवाडीतील बिंदूमाधव ठाकरे चौकात वाहतूक कोंडी होते. ती फोडण्यासाठी उड्डाणपूल किंवा ग्रेड सेपरेटरच्या पर्यायाचा विचार केला जात आहे. शास्त्रीनगर चौकातही या दोन्हींपैकी एक सुविधा उभारण्याची गरज आहे.

चार पूल, १२ उड्डाणपूल आणि एक बोगदा

वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेने २००८मध्ये आणि ‘पीएमआरडीए’ने २०१८मध्ये सर्वंकष वाहतूक आराखडा तयार केला. त्यानुसार पहिल्या टप्प्यात नदीवरील चार पूल, १२ ग्रेड सेपरेटर/उड्डाणपूल, चार रेल्वे उड्डाणपूल आणि एक बोगदा प्रस्तावित करण्यात आला. त्यासाठी १,३९४ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. राज्य सरकारकडे निधीची मागणी करण्यात आली असली, तरी अद्याप तो निधी मिळालेला नाही. याशिवाय शहरातील वेगवेगळ्या विकास कामांसाठी दोन हजार ३७४ कोटी रुपयांचा आराखडा सरकारला सादर करण्यात आला आहे. त्यामध्ये विविध उड्डाणपूल, ग्रेडसेपरेटर, रेल्वे उड्डाणपुलांचा समावेश आहे.

३२ देश, ३० हजार किमीचा रस्ता, १२० दिवसांचा प्रवास; पुण्यातलं मराठी कुटुंब निघालं कारने लंडनला

उड्डाणपूल-ग्रेड सेपरेटरची उभारणीसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्तीसाठी निविदा प्रकाशित केल्या आहेत. सल्लागारांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्याकडून या प्रकल्पांचा व्यवहारार्यतेबद्दलचा अहवाल महापालिकेला सादर केला जाईल. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल.

श्रीनिवास बोनाला, मुख्य अभियंता (प्रकल्प), पुणे महाालिका.

शहरातील प्रस्तावित प्रकल्प आणि तरतूद (कोटी रुपयांत)

नदीवरील पूल

मुंढवा ताडीगुत्ता चौक ते वडगाव शेरी ५०

कोरेगाव पार्क ते कल्याणीनगर ३०

पानमळ्याजवळ कर्वे रस्ता, सिंहगड रस्ता ४२

लुंबिनीनगरजवळ पुणे स्टेशन ते संगमवाडी ४५

ग्रेडसेपरेटर/उड्डाणपूल

बिंदूमाधव ठाकरे चौक (संगमवाडी) ६०

आंबेडकर चौक (येरवडा) ४०

५०९ चौक (विश्रांतवाडी) ३७

शास्त्रीनगर चौक ७०

खराडी बायपास चौक ६५

विश्रांतवाडी चौक ५५

काळुबाई चौक (सोलापूर रस्ता) ३५

विद्यापीठ चौक (ग्रेडसेपरेटर) ५०

हरिकृष्ण मंदिर पथ (ग्रेडसेपरेटर) ३५

शिमला ऑफिस चौक (ग्रेडसेपरेटर) ३५

मुंढवा चौक ६०

दांडेकर पूल ४५

रेल्वे उड्डाणपूल

घोरपडी येथील पुणे-मिरज रेल्वे लाइन ६०

साधू वासवानी पूल ६५

ससाणेनगर ५०

फुरसुंगी, रेल्वे उड्डाणपूल रुंदीकरण ६५

बोगदा

हिंगणे ते पद्मावती (सिंहगड रस्ता ते सातारा रस्ता) ४००

महाराष्ट्रातील पहिले गिधाड संवर्धन, प्रजनन केंद्र पुण्यात; जेजुरीजवळील पिंगोरी येथे उभारणी सुरु

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed