• Mon. Nov 25th, 2024

    महाराष्ट्रातील या भागांत मेघगर्जनेसह पाऊस कोसळणार; असा आहे हवामान खात्याचा ताजा अंदाज

    महाराष्ट्रातील या भागांत मेघगर्जनेसह पाऊस कोसळणार; असा आहे हवामान खात्याचा ताजा अंदाज

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : पावसाचा अभाव, तापमानात वाढ आणि आर्द्रता यामुळे असह्य उकाड्याची जाणीव होत असताना शनिवारी पावसाने हजेरी लावल्यामुळे वातावरणामध्ये बदल जाणवला. मुंबईमध्ये कुलाबा येथे ३० मिलीमीटर, तर सांताक्रूझ येथे ०.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. ठाणे, नवी मुंबई परिसरामध्येही शनिवारी पावसाने चांगली उपस्थिती लावली. उत्तर मुंबईत मात्र दिवसभरात फारसा पाऊस नव्हता. दिवसभर उत्तर मुंबईत आभाळ ढगाळ असले तरी संध्याकाळी उशिरापर्यंत पावसाची उपस्थिती नव्हती.

    ऑगस्ट महिन्यात कुलाबा येथे ३१ दिवसांमध्ये पावसाने १०० मिलीमीटरचा टप्पाही गाठला नाही. त्यामुळे शनिवारी सकाळपासून पडलेल्या पावसाने दिवसभरात ३० मिलीमीटर पाऊस झाल्याने मान्सून पुन्हा सक्रीय झाल्याची जाणीव मुंबईकरांना झाली. सकाळी ७ वाजल्यापासून झालेल्या नोंदीनुसार १२ तासांमध्ये हाजी अली पम्पिंग स्टेशन येथे ८२ मिलीमीटर, मलबार हिल येथे ७७ मिलीमीटर पाऊस नोंदला गेला. कुलाबा पम्पिंग स्टेशन, ग्रँट रोड नेत रुग्णालय, बी विभाग कार्यालय येथेही ५० मिलीमीटर किंवा अधिक पावसाची नोंद झाली. त्या तुलनेत वांद्रेच्या पुढे उत्तर मुंबईत पावसाचा केवळ शिडकावा झाला. शुक्रवारी रात्री उशिरापासून नवी मुंबई परिसरातही पावसाची उपस्थिती होती. दिवसभरात मात्र फारसा पाऊस पडला नाही. दिवले, नेरुळ येथे २० मिलीमीटरच्या आसपास पाऊस नोंदला गेला. ठाण्यात मात्र ठिकठिकाणी पावसाचा जोर वाढल्याचे दिसले. चिराग नगर, ओसवाल पार्क, मानपाडा येथे ४० मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली.

    काय आहे हवामान अंदाज? कुठे पाऊस कोसळणार?

    कर्नाटक ते विदर्भ या भागांमध्ये ढगांची द्रोणीय स्थिती निर्माण झाल्याने तसेच उत्तर बंगालच्या उपसागरात चक्रीय वातस्थिती निर्माण झाल्याने राज्यातील पावसाला पुन्हा चालना मिळाली आहे. सकाळी पावसाचा जोर वाढल्यानंतर दुपारनंतर प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या अद्ययावत इशाऱ्यानुसार ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला. मात्र, रविवारपासून बुधवारपर्यंतच्या चार दिवसांमध्ये पावसाचा जोर फार नसेल, असे पूर्वानुमान शनिवारी वर्तवण्यात आले. मराठवाडा, विदर्भामध्ये तसेच मध्य महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये रविवार, सोमवार या दोन दिवसांत तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शनिवारी मात्र कोकण वगळता इतर ठिकाणी पावसाचा जोर फारसा नव्हता. विदर्भात भारतीय हवामान विभागाच्या केंद्रांवर बहुतांश ठिकाणी अजिबात पाऊस पडला नाही. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील केंद्रांवरही फारसा पाऊस नव्हता.

    पावसाळी वातावरणाचा तापमानावर परिणाम

    गेला आठवडाभर तापलेले वातावरण पावसाळी हवेमुळे थोडे निवले. मुंबईत कुलाबा येथे अवघ्या २४ तासांमध्ये कमाल तापमानाचा पारा ४.२ अंशांनी खाली उतरला. मुंबईत कुलाबा येथे २८, तर सांताक्रूझ येथे २९.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. डहाणू येथेही पारा ५.२ अंशांनी उतरून २७.६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रातही कोल्हापूर येथे कमाल तापमानात २४ तासांमध्ये २.७ अंश व महाबळेश्वर येथे ३.३ अंशांनी घट झाली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *