• Mon. Nov 25th, 2024
    अंतरवाली घटनेचे पडसाद; शरद पवारांनी गृहखात्यावर साधला निशाणा, म्हणाले- अतिरेकी भूमिका घेतली गेली

    जालना: अंबड तालुक्यातील वडिगोड्री महामार्गावर जाळपोळीच्या घटना घडली आहे. अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलनकर्ते उपोषणासाठी बसले होते. त्यांना काल रात्री पोलिसांनी उठवण्याचा प्रयत्न केला होता. तो गावकऱ्यांनी हाणून पडला होता. मात्र आज दुपारी पुन्हा पोलिसांनी उपोषण कर्त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला असता गावकऱ्यांनी प्रचंड विरोध केला. यामुळे पोलीस आणि गावकऱ्यांमध्ये वादावादी झाल्याचे चित्र पहायला मिळाले. यानंतर पोलिसांनी लाठीचार्जही केला.
    जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज; मोठ्या प्रमाणात दगडफेक, पोलिसांकडून हवेत गोळीबार
    जालन्यातील शहागड येथे आज मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी मराठा जन आक्रोश आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी राज्य सरकारला मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अल्टीमेटम दिला होता. पण आरक्षणाबाबत राज्य सरकारने कोणताही ठोस निर्णय न घेतल्याने आंदोलनकर्त्यांनी अखेर अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरु केले आहे. जोपर्यंत राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला होता. त्यात अज्ञात समाज कंटकांनी दगडफेक केली. त्यात काही पोलीस अधिकारी, कर्मचारी, महिला कर्मचारी जखमी झाले आहेत. तसेच गावकरी देखील जखमी झाले आहेत.

    जालन्यात पोलिसांकडून लाठीचार्ज तर आंदोलकांकडून दगडफेक, आंदोलक अन् पोलीस जखमी

    दरम्यान पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याने महिला आंदोलक जखमी झाल्याचे दिसून येत आहे. तर आंदोलकांच्या दगडफेकीमध्ये पोलीस कर्मचारी तसेच महिला पोलीस जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. वडीगोद्री महामार्गावर आंदोलकांच्या वतीने दोन बस जाळण्यात आल्या असून दोन बसेसवर दगडफेक करण्यात आली आहे. तसेच एक ट्रकसुद्धा जाळण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. औरंगाबाद सोलापूर महामार्गावर तीन ते चार बसेसची जाळपोळ करण्यात आली आहे.या घटनेचे राज्यात आता प्रतिसाद उमटायला सुरूवात झाली आहे. या घटनेवर सर्व स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान नेते मंडळींनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.

    शरद पवारांची प्रतिक्रिया

    या घटनेवर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, आंदोलक आणि पोलिसांमध्ये चर्चा झाली होती. कारण नसताना लाठी हल्ला करण्यात आला आहे. चर्चा झाल्यानंतरही पोलिसांकडून बळाचा वापर करण्यात आला. या प्रकरणात गृहखात्याकडून अतिरेकी भूमिका घेतली गेली आहे. या लाठीहल्ल्याचा मी निषेध करतो.

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

    जालना येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनातील आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडून या घटनेची माहिती घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत. जनतेने शांतता राखावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

    रोहित पवारांची प्रतिक्रिया

    जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावातील मराठा समाजाचे आंदोलन उधळण्यासाठी अमानुषपणे लाठीचार्ज करणाऱ्या राज्य सरकारचा जाहीर निषेध. राज्य सरकारला सत्तेची मस्ती चढली असून सत्तेच्या मस्तीतूनच सरकार असा लाठीचार्ज करत आहे. आता या मस्तवाल आणि घमेंडिया सरकारची मस्ती उतरवण्याची वेळ आली आहे.

    अंबादास दानवेंनी प्रतिक्रिया

    जालन्यातील अंतरवाली सराटी या गावात मराठा समाजाचे आंदोलन मोडून काढण्यात पोलिसांनी बळाचा, बेछूट लाठीचा वापर केला आहे. हवेत गोळीबरही केल्याचे वृत्त आहे. याचा मी निषेध करतो. शांततेने आंदोलन सुरू असताना ते दडपण्यासाठी केलेली ही कृती कोणाच्या सांगण्यावरून केली गेली याचे उत्तर गृहमंत्री @Dev_Fadnavis यांनी द्यायला हवे.

    सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

    मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला.‌ हे अतिशय संतापजनक आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या भुलथापा देऊन भाजपाने मते घेतली. परंतु आरक्षणाच्या बाबतीत मराठा समाजाला केवळ आश्वासने देण्यापलीकडे भाजपाने काहीही केले नाही, ही वस्तुस्थिती आहे. मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याबाबत आमची भूमिका स्पष्ट आहे. परंतु भाजपाने यासंदर्भात सातत्याने संभ्रम वाढविणारी भूमिका घेतली. केंद्र आणि राज्यात एकाच पक्षाचे, विचारांचे सरकार असूनही आरक्षण दिले जात नाही हि खेदाची बाब आहे. मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांवर लाठीहल्ला करुन भाजप सरकारने समाजाची क्रूर फसवणूक केली आहे. भाजपाने मराठा समाजाची याबद्दल माफी मागितली पाहिजे. या लाठी हल्ल्याचा निषेध.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *