या प्रकरणी पोलिसांनी तरुणासह त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना अटक केली आहे. या चोरीच्या गुन्ह्यासोबतच आरोपींकडून शहरातून वाहन चोरीचे गुन्हेही उघडकीस आले आहेत.
सक्करधरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोमवार क्वार्टर परिसरात राहणारी फिर्यादी महिला कल्पना घोडे यांचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे दोन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. ही घटना २५ ऑगस्ट रोजी घडली, तेव्हा कल्पना आपल्या पतीचा मृतदेह रुग्णवाहिकेतून घेऊन सिर्सी गिरड या मूळगावी अंत्यसंस्कारासाठी गेल्या होत्या.
घराजवळ लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजवरून पोलिसांना चोरट्यांचा सुगावा लागला आणि यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा पर्दाफाश करताना एक आरोपी आणि त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले.
रुग्णवाहिका चालक अश्वजित वानखेडे यांनी आपल्या मुलामार्फत टीप देऊन ही चोरी करून घेतली. या प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपी रितेश वानखेडे आणि त्याच्या दोन अल्पवयीन मित्रांची पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली. यानंतर त्यांच्याकडून चोरीचा मालही जप्त करण्यात आला. या प्रकरणी रुग्णवाहिका चालक अश्वजित विश्वजित वानखेडे यालाही पोलिसांनी आरोपी केले आहे.
चौकशीदरम्यान, आरोपींनी शहरातील सक्करदरा, अजनी आणि इमामवाडा पोलिस स्टेशन परिसरातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली, त्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडून पाच दुचाकीही जप्त केल्या. तिन्ही आरोपी हे अमली पदार्थांचे व्यसनी असून आपले व्यसन पूर्ण करण्यासाठी ते शहरात चोरीच्या या घटना करत होते.