येत्या वर्षभरात ही लस बाजारात उपलब्ध होणार असल्याची माहिती सिरम इस्टिट्यूटचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक सायरस पूनावाला यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात दिली आहे.
पावसाळ्यात लाखो नागरिक डेंग्यू आणि मलेरियाच्या प्रादुर्भावाने आजारी पडतात. डेंग्यूमुळे तर अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. त्यामुळे या रोगांवर लस निर्माण होण्याची आवश्यकता होतीच. आता ही अभिमानास्पद कामगिरी सिरमने करून दाखवली आहे.
अनेक वर्षांपासून सीरम इस्टिट्यूटचे शास्त्रज्ञ या आजारांवर लस शोधून काढण्याचा प्रयत्न करत होते. या शास्त्रज्ञांना लस तयार करण्यात आता यश आलं आहे. वर्षभरात ही लस बाजारात उपलब्ध होणार आहे.
याबाबत अधिक बोलताना सायरस पुनावाला म्हणाले की, ‘आम्ही आत्तापर्यंत खूप लसी बनवल्या आहेत. सध्या देशासह जगभरात डेंग्यू, मलेरिया या आजारांनी थैमान घातलं आहे. त्यामुळे आता डेंग्यू, मलेरिया या आजारांवर सिरमकडून लस तयार करण्यात येणार आहे. येत्या वर्षभरात ही लस बाजारात उपलब्ध होईल.’
दुसरीकडे, सीरमचे शास्त्रज्ञ डेंग्यू आणि मलेरिया बरोबरच कर्करोगावरही संशोधन करत आहेत. कर्करोगासारख्या गंभीर आजारावर लस शोधून काढण्याचा प्रयत्न ते करत आहेत.