‘मोसंबीचे आगार’ असलेल्या जालना आणि बीड जिल्ह्यात पावसाअभावी फळगळ वाढली आहे. फळझाडांवर पाण्याचा ताण पडल्यामुळे २० ते ४० टक्के फळांची गळती होत आहे. झाडांवर फळे टिकत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी फळांची विक्री सुरू केली आहे. सध्या मोसंबीचा दर प्रतिटन १८ ते १९ हजार रुपये आहे. फळगळतीमुळे व्यापाऱ्यांनी मोसंबीचे प्रतिटन पैसे देण्याऐवजी झाडाच्या संख्येनुसार दर ठरवले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे निम्मे नुकसान झाले आहे. दोन हजार झाडांसाठी अडीच लाख रुपये दर मिळाला आहे. फळगळ सुरू असल्यामुळे फळे टिकण्याची शक्यता नाही. या परिस्थितीत शेतकरी बागा विकत आहेत. व्यापाऱ्यांनी अडवणूक केल्यामुळे मोसंबीची बेभाव विक्री सुरू आहे, असे शेतकऱ्यांनी सांगितले. गेवराई आणि घनसावंगी तालुक्यात फळगळ सर्वाधिक आहे. घनसावंगी तालुक्यातील गुरुपिंप्री, वाडगाव, बोलेगाव, राणी उंचेगाव, चापडगाव, पानेवाडी, राजेगाव, अंतरवाली येथील मोसंबी फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून परिस्थितीकडे लक्ष वेधले आहे. आमदार अमरसिंग पंडित यांनी गेवराई येथे आणि आमदार राजेश टोपे यांनी घनसावंगी येथे कृषी शास्त्रज्ञांना निमंत्रित करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. लिंबूवर्गीय फळे पाण्याच्या बाबतीत संवेदनशील असतात. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक उष्णता होती. त्यामुळे जमिनीतील ओल कमी होऊन झाडांवर ताण पडला आहे. भारी जमिनीत ही समस्या नेहमीच असते. त्यामुळे काळ्या, खोल जमिनीत फळबाग लागवड करू नये, असे कृषी शास्त्रज्ञ डॉ. संजय पाटील यांनी सांगितले. दुष्काळ जाहीर झाला नसल्यामुळे शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. किमान पंचनामे करून नुकसानीची नोंद करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
फळबागांचे नुकसान वाढले
सन २०१२मध्ये पडलेल्या दुष्काळात मोसंबीच्या फळबागा जळाल्या होत्या. त्यानंतर डाळिंबाचे क्षेत्र वाढले होते. या वर्षी पावसाने दडी मारल्यामुळे पाणीसाठा घटला आहे. विहिरी, शेततळे आणि कूपनलिकांतही पाणी नसल्यामुळे फळबागा कशा जगविणार असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. मराठवाड्यातील फळबागा टिकविण्याबाबत तातडीने उपाययोजना राबविण्याची मागणी करण्यात आली आहे.
अतिवृष्टी झाल्यास किंवा पाण्याचा ताण पडल्यास मोसंबीची फळगळ होते. भारी आणि काळी माती असलेल्या भागात ही समस्या जास्त आहे. फळात गोडी निर्माण झाल्यामुळे डास वाढले आहेत. शेतकऱ्यांनी आमिष सापळे लावून आणि फळगळ झालेली फळे बाहेर फेकून नियंत्रण करावे.- डॉ. संजय पाटील, कृषी शास्त्रज्ञ
मोसंबीचे सर्वाधिक क्षेत्र असलेल्या घनसावंगी तालुक्यात सर्वत्र मोसंबीची फळगळ सुरू आहे. बहार हाती लागणार नसल्यामुळे शेतकरी मोसंबी विकत आहेत. दरवर्षीच्या तुलनेत कमी दराने विक्री केली आहे. फळबागांचे पंचनामे करून भरपाई देण्याची गरज आहे.- आकाश कोल्हे, शेतकरी, घनसावंगी